Fraud: मेसेज पाठवून लाखो रुपयांची फसवणूक, दोन आरोपींना अटक

0

मुंबई,दि.7: Fraud: मेसेज पाठवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी मुंगेर जिल्ह्यातून सायबर गुन्ह्यातील दोन तरुणांना अटक केली आहे. आरोपी मुंगेर जिल्ह्यातील परसंडो गावातील रहिवासी आहेत. अटक करण्यात आलेल्या या दोन तरुणांनी डिसेंबर 2022 मध्ये मुंबईतील एका महिलेला लाखो रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला होता. आपण बँकेचे अधिकारी असल्याचं सांगत या तरुणांनी महिलेच्या बँक खात्यातून 2,70,990 रुपये गायब केले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलीस ठाणे गाठत या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. अखेर पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे.

दोन हजारांच्या आमिषाने फसवणूक

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींची नावे राजन आणि किशोर उर्फ अभिनव अशी आहेत. ते मुंगेर जिल्ह्यातील हवेली खडगपूर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या पससंडो गावातील रहिवासी आहेत. त्यांनी मुंबईची रहिवासी असलेल्या एका महिलेला एक संदेश पाठवला. ज्यामध्ये आपण बँकेचे नोडल अधिकारी असून, तुम्हाला दोन हजार रुपयांची लॉटरी लागली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा असा मेसेज होता. या महिलेने लिंकवर क्लिक करताच तिच्या अकाऊंटमध्ये असलेली सर्व रक्कम आरोपीच्या खात्यावर ट्रान्सफर झाली.

आरोपींना अटक

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीच्या आधारे संबंधित आरोपींविरोधात आयपीसी कलम 420 आणि आयटी अॅक्ट 66 सीडी अंतर्गत गु्न्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मुंगेर गाठत तेथील पोलिसांच्या मदतीनं आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना मुंबईत आणण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here