सोलापूर,दि.30: रेशनिंग दुकानामधून मिळणारा तांदूळ हा फोर्टिफाईड तांदूळ आहे. सध्या स्वस्त धान्य दुकानातील तांदळात प्लॅस्टिकचे तांदूळ मिळत असलेबाबत ग्राहक दुकानदारांना विचारणा करत आहेत. केंद्र शासनाच्या अन्नसुरक्षा योजनंअंतर्गत हा फोर्टिफाईड तांदूळ सर्व स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत आहे. नागरिकांनी या तांदळाच्या वापराबाबत कोणताही गैरसमज न बाळगता याचा आहारात समावेश करणे गरजेचे असून हा तांदुळ खाल्ल्याने कोणतेही दुषपरिणाम होणार नाही तसेच हा फोर्टिफाईड तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले.
फोर्टिफाईड तांदूळामध्ये पोषकयुक्त घटक आहेत. सामान्य तांदळापेक्षा फोर्टीफाईड तांदूळ अधिक पोषक असून शरीरास आवश्यक पोषक तत्वांची पुर्तता फोर्टिफाईड तांदूळ करतो. शरीरात पोषक तत्वाचे घटक कमी असतील तर फोर्टिफाईड तांदूळ खाल्याने पोषणतत्वाचे कमतरता दूर करण्यास मदत मिळेल. फोर्टिफाईड तांदूळमध्ये थलोसिमिया, सिकलसेल असे आजार रोखण्यासाठी उपयुक्त आहे. फोर्टिफाईड तांदळामध्ये लोह, फॉलिक ॲसिड, व्हिटामिन बी-12 चे सूक्ष्म अन्नद्रव्य असून आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. वजनाने हलके असल्याने ते पाण्यावर तरंगतात फोर्टिफाईड तांदळाबाबत लाभार्थ्यांना शंका किंवा अडचणी असल्यास आपले तहसिल कार्यालयात पुरवठा विभागाशी संपर्क करण्यात यावा.
फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे काय?
फोर्टिफाईड तांदूळ हे तांदळाच्या पिठापासून बनलेले असतात. ज्यात आरोग्यासाठी आवश्यक सूक्ष्म् पोषक घटक असतात. प्रथम तांदळाचे भुकटी तयार केली जाते आणि त्यात लोह, फॉलिक ॲसीड, व्हिटामिन बी-12 चे सूक्ष्म् अन्नद्रव्य् मिश्रण केले जाते. या मिश्रणाला पुन्हा तांदळाचा आकार दिला जातो. यालाच फोर्टिफाईड तांदूळ म्हणतात. 100 किलोमध्ये 1 किलो फोर्टिफाईड तांदूळ मिसळून वितरीत केला जातो.
फोर्टिफाईड तांदळाच्या वापराबाबत सर्व तालुक्यात जनजागृती करण्याबाबत सूचित केले असून, शासनामार्फत प्राप्त चलचित्र देखील प्रसारमाध्यमामधून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2023 पासून गुणसंवर्धित तांदळाचा (फोर्टिफाईड तांदूळ) वितरण करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी या तांदळाविषयी उठवणाऱ्या अफावांविषयी विश्वास ठेवू नये. शासनाने फोर्टिफाईड तांदळाच्या शुध्दतेचे व पौष्टिकतेचे सर्व निकष तपासलेले आहेत आणि शासनाने ते मान्य केले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले आहे.