मुंबई,दि.20: माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत (Deepak Sawant Accident) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. घोडबंदर येथून पालघरच्या दिशेने प्रवास करत असताना दीपक सावंत (Deepak Sawant) यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. डंपरने गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. डंपर चालकाला काशिमीरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून सावंत हे स्वतःच रुग्णवाहिकेने मुंबई येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
कसा झाला अपघात? | Deepak Sawant Accident
राज्यात नेत्याच्या अपघाताचं सत्र सुरूच आहे. पालघरच्या मोखाद्यात कुपोषित मुलांच्या झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यासाठी दीपक सावंत जात होते. दरम्यान सकाळी साडेअकराच्या सुमारास घोडबंदर येथील सगनाई नाका येथे पोहचले असताना त्यांच्या गाडीला एका डंपरने मागून धडक दिली. यात सावंत यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीनं उपचारासाठी अंधेरीमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या अपघातामध्ये त्यांच्या कारच देखील मोठं नुकसान झालं आहे.
डंपर चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात | Accident News
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी काशिमीरा पोलिसांनी धाव घेऊन डंपर चालक इर्शाद शहजाद खान याला ताब्यात घेतले आहे. तर सावंत हे स्वतःच रुग्णावाहिकेने प्रवास करून अंधेरी येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
या घटनेतील दोन्ही वाहनांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली आहे.
कोण आहेत दीपक सावंत? | Deepak Sawant
दीपक सावंत हे विधानपरिषदेचे माजी सदस्य आहेत. शिवसेनेकडून त्यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. जुलै 2004 मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यानंतर 2006 आणि 2012 मध्ये ते पुन्हा निवडून आले. मात्र त्यांना तिसऱ्या वेळी तिकीट नाकारण्यात आले.
डिसेंबर 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. याचवेळी त्यांच्याकडे भंडारा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली होती.