मुंबई,दि.6:Anil Deshmukh: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात सीबीआयने (CBI) अनिल देशमुख यांना ताब्यात घेतले आहे. सीबीआयचे पथक त्यांना रिमांडसाठी विशेष सीबीआय न्यायालयात हजर करणार आहे. मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी अनिल देशमुख यांनी विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
विशेष न्यायालयाच्या निर्णयामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयला देशमुख यांना ताब्यात घेण्याची परवानगी मिळाली. देशमुख यांनी सोमवारी अधिवक्ता अनिकेत निकम यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सीबीआय कोठडीची मागणी करणाऱ्या याचिकेलाही आव्हान दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) ज्येष्ठ नेत्याची याचिका बुधवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणीसाठी सूचीबद्ध आहे.
विशेष सीबीआय न्यायालयाने 31 मार्च रोजी सीबीआयने दाखल केलेल्या अर्जाला परवानगी दिली होती आणि एजन्सीला देशमुख आणि संजीव पालांडे, कुंदन शिंदे (देशमुख यांचे माजी सहकारी) आणि बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे या तिघांना ताब्यात घेण्याची परवानगी दिली होती.