दि.3 : कारला लागलेल्या आगीत होरपळून माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. शिलाँग-गुवाहाटी राष्ट्रीय महामार्गावर जळीत कारची थरारक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत, कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. बर्निंग कारच्या थरारामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. News 18 लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्डिनँड बंशान लिंगदोह असं संबंधित दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव असून ते मेघालयचे माजी मुख्यमंत्री ई. के. मावलोंग (Former CM E K Mawlong) यांचे सुपूत्र आहेत. मेघालयमधील काँग्रेसचे विद्यमान आमदार जॉर्ज लिंगदोह हे त्यांचे भाऊ असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. मृत फर्डिनँड लिंगदोह यांच्या नातेवाईकांनी घटनेची पुष्टी केली आहे.
मृत फर्डिनँड बंशान लिंगदोह हे इम्फाळमधील केंद्रीय कृषी विद्यापिठात एक प्राध्यापक म्हणून काम करत होते. दरम्यान काल शिलाँग-गुवाहाटी राष्ट्रीय महामार्गावर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. कारला नेमकी आग कशी लागली? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसून पोलिसांकडून आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.