भाजपाच्या माजी खासदाराने केला आम आदमी पक्षात प्रवेश

0

नवी दिल्ली,दि.२१: भाजपाच्या माजी खासदाराने आम आदमी पक्षात (AAP) प्रवेश केला आहे. वंचितचे नेते माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनीही आपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने दोन वर्षांवर येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक, सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली गुजरात आणि हिमाचल विधानसभेची निवडणूक आणि तीन-चार महिन्यांवर असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने जोरदार रणनीती आखली आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून पक्षात काही महत्त्वाच्या नेत्यांचे प्रवेश होत आहेत. आज महाराष्ट्रातील २ बड्या नेत्यांनी ‘आप’चा झाडू हातात घेतला.

वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून प्रकाश आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे नेते, माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी आज ‘आप’मध्ये प्रवेश केला. तर भाजपचे माजी खासदार, बंजारा ओबीसी समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनीही आज आम आदमी पक्षाचा झाडू हाती घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत राजधानी नवी दिल्लीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. केजरीवाल यांच्या डॅशिंग नेतृत्वाने प्रभावित होऊन आम्ही आम आदमी पक्षात प्रवेश करत असल्याच्या भावना दोघा नेत्यांनी व्यक्त केल्या.

आम आदमी पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्ष प्रवेशाची माहिती दिली. आपने म्हटलंय, अरविंद केजरीवाल यांच्या डॅशिंग नेतृत्वाने प्रेरित होऊन सर्व कानाकोपऱ्यातून चांगले लोक एकत्र येत आहेत. आज महाराष्ट्रातले प्रमुख ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी आम आदमी पक्षात केजरीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.

हरिभाऊ राठोड हे भारतीय जनता पक्षातसं एकेकाळचं महत्त्वाचं नाव. ओबीसी नेते असल्याने गोपीनाथ मुंडे यांच्या ते निकटवर्तीयांपैकी एक होते. २००४ ते २००८ या काळात हरिभाऊ भाजपकडून खासदार होते. पण काही कारणांनी भाजपने त्यांच्यालर निलंबनाची कारवाई केली. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथेही त्यांचं मन रमलं नाही. पुढे त्यांनी शिवसेनेशी जवळीक साधली. पण दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. आता त्यांनी पुढचं भवितव्य ‘आप’चं आहे म्हणत केजरीवालांचं झाडू हाती घेतलाय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here