सोलापूर,दि.१०: ‘केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे’ या म्हणीप्रमाणे काही तरुणांनी एकत्र येऊन सोलापुरात पहिली आयटी कंपनी सुरू केली आहे. त्यामुळे आयटी इंजिनीअर्सचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अशा प्रकारे आणखीन काही कंपन्या शहरात आल्यास सोलापूरचे स्थलांतर रोखण्यास मदत होईल.
सोलापूर शहरातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनीअरिंग पूर्ण केलेल्या सुमित कुडल या तरुणाच्या पुढाकाराने जुळे सोलापूरातील डीमार्टजवळ ‘व्हो’ ऑटोमिनेशन या नावाने आयटी कंपनी सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. याठिकाणी पहिल्या दिवसापासून वीस इंजिनीअर कार्यरत आहेत. या कंपनीबाबत माहिती देताना सुमित म्हणाले, सिंहगडमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात सात वर्ष आयटी कंपनीमध्ये नोकरी केली.
दरम्यान, कोरोनाच्या काळात सोलापुरातून दोन वर्ष वर्कफ्रॉम होम काम करत असताना सोलापुरातच आयटी कंपनी सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. कपिल शर्मा, वैभव पाटील या मित्रांना याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी यासाठी सहकार्य केले. बंगळुरूच्या एस. एल. के. (किर्लोस्कर ग्रुप) मदतीने सोलापुरात पहिली आयटी कंपनी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापुरात सुरू झालेली ही कंपनी पूर्णतः प्रॉडक्ट बेस कंपनी असून याठिकाणी वीस स्थानिक तरुण अभियंत्यांना संधी देण्यात आली आहे. जे सध्या पुणे बंगळुरूसारख्या ठिकाणी कार्यरत होते. स्थानिक ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळाल्यानंतर आई-वडिलांबरोबर राहण्याचा आनंद असल्याचे एका अभियंत्याने सांगितले. सोलापुरात आयटी क्षेत्र विस्तारण्यासाठी भरपूर संधी असून त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असल्याचे वैभव पाटील यांनी सांगितले. जे लोकप्रतिनिधींना जमले नाही ते काही तरुणांनी करून दाखवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.