दारुबंदीच्या ठरावावरुन ग्रामसभेत राडा, दोन गटात तुंबळ हाणामारी

0

कोल्हापूर,दि.29: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्यातील शिरढोण गावात दारुबंदीवरुन हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एकीकडे राज्यभरातील अनेक ठिकाणी दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी करत महिला आक्रमक होताना दिसतात, तर दुसरीकडे कोल्हापुरातील शिरढोण गावात मात्र वेगळंच चित्र आहे. या गावातील ग्रामसभेत दारूबंदी करण्यावरून महिलांचा दोन गट एकमेकांसमोर आला आणि त्यानंतर त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याचं दिसून आलं.

दारुबंदीच्या ठरावावरुन ग्रामसभेत राडा

कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावच्या महिला दारूबंदी ठरावावरुन आक्रमक झाल्या. दारुबंदीच्या ठरावासाठी बोलावण्यात आलेल्या महिला ग्रामसभेत ठरावावरुन दोन गटात राडा झाला. गावात दारू दुकान सुरू होऊ न देण्याचा निर्धार एका गटाने केल्यानंतर त्याला दुसऱ्या गटाने विरोध केला. या प्रकारानंतरही गावात दारू दुकान सुरू होऊ न देण्याचा महिलांचा निर्धार कायम आहे.

शिरोळ तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायतच्या पटांगणात सोमवारी झालेल्या ग्रामसभेचे रुपातरण हाणामारीत झाले. दारूबंदी ठरावावरुन बोलावललेल्या ग्रामसभेत महिलाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. शिरढोण ग्रामपंचायतीसमोरच हा सगळा प्रकार घडला.

2016 साली गावात महिला ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव करण्यात आला होता. मात्र, गावातील दोन व्यवसायिकांनी दारूविक्रीचा परवाना मागितला होता. हा परवाना देण्यास ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केला होता. त्यामुळे ग्रामसभेचे विषय पत्रिकेवर या विषयी निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

गावातीलच दोन व्यावसायिकांनी गावातच बीअरबारसाठी परवाना मागितला होता. पण हॉटेल परवानगीच्या नावाखाली परमिटम रुमच्या लायसन्ससाठी पत्रव्यवहार केला असा गावातील महिलांच्या एका गटाचा आरोप होता. पण गावात चोरून दारू विक्री चालते मग अधिकृत परवाना घेऊन विकली जाणारी दारू का चालत नाही असा सवाल विरोधी गटातील महिलांनी केला.

दारूच्या विषयावरुन गावातील वातावरण आजही तणावपूर्ण आहे. एका गटाने परमिट रूम, दारू विक्री नको अशी भूमिका घेतलीय तर दुसऱ्या गटाने गावात छुप्या पद्धतीने दारू विक्री होण्याला आक्षेप घेतला. छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असेल तर परवाना घेऊन विक्री होऊ दे अशी भूमिका या दुसऱ्या गटाने घेतल्याचं दिसून आलंय. त्यामुळे कोल्हापुरातील शिरढोण गावातील दारूबंदी हा कळीचा मुद्दा बनलाय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here