सोलापूर,दि.22: सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा मतदार संघातून कोण विजयी होणार याबद्दल अनेक ठिकाणी पैज लावली जात आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यात तर माढा लोकसभा मतदार संघात धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत झाली आहे. या मतदार संघातील निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. माढ्यातून निवडून तर येणार फक्त तुतारी असे म्हणत शेतकरी बंधूनी भाजपाला पैज लावायचे आव्हान दिले आहे. तुतारी हे धैर्यशील मोहिते पाटील यांचे चिन्ह आहे.
माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपाचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात अंत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यावेळी राज्यातील शेतकरी कांदा निर्यातीवरून सत्ताधारी पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी वर्ग हा भाजपावर प्रचंड नाराज असल्याचे दिसून येते. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील विजयी होणार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
tv9 मराठीशी बोलताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बंधूनी पैज लावायची तयारी दर्शवली आहे. tv9 मराठीशी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील जिंकणार यावर ठाम असलेल्या दोन शेतकरी बंधुंनी 11 बुलेटची पैज लावण्याची ऑफर दिली आहे. योगेश पाटील आणि निलेश पाटील अशी या दोन युवा शेतकऱ्यांची नाव आहेत. “दहावर्षात भाजपा सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक केली. कांदा, वाढती महागाई, औषध, खतं, जीएसटी याचा शेतकऱ्याला फटका बसला” असं निलेश पाटील म्हणाले. “शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्याला असा त्रास झाला नव्हता. म्हणून पवारांच्या तुतारीला निवडून आणायच धेय्य आहे. 70 टक्के मतदान तुतारीला झालय. माढा तालुक्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 30 ते 40 हजाराचा लीड मिळेल” असा विश्वास निलेश पाटीलने व्यक्त केला.
भाजपाला आव्हान
tv9 मराठीशी बोलताना 11 बुलेटची पैज का? यावर बुलेट ही शेतकऱ्याची हौशेची गोष्ट असल्याच उत्तर दिलं. शेतीतून असही काही मिळत नाही, त्यामुळे शेती विकून बुलेटची पैज लावायला हे दोन्ही बंधु तयार आहेत. भाजपाला विजयाची गॅरेंटी असेल, तर त्यांनी हे आव्हान स्वीकराव असं त्यांनी म्हटलं आहे. माढ्यातून रणजीतसिंह निंबाळकर विद्यमान खासदार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट मिळालं नाही. म्हणून निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतली.