Pandit Shivkumar Sharma: जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन

1

दि.10: संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार (Pandit Shivkumar Sharma) शर्मा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. संतुर वाद्याला संगीत विश्वात वेगळी ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

1956 साली त्यांनी व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या गाण्याला संगीत दिलं होतं. 1967 साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत ‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली होती जी अप्लावधीच प्रसिद्ध झाली. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीनं त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिलं. त्याची सुरुवात 1980 साली ‘सिलसिला’ चित्रपटापासून झाली. या काळात या जोडगोळीने ‘शिव-हरी’ या नावानं संगीत दिलं. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर, फासले (1985), चांदनी (1989), लम्हे (1991), डर (1993) हे आहेत.

भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदान अतुलनीय होते. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली. ‘सिलसिला’ या चित्रपटाला बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे.

‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही त्यांची ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामध्ये पं. हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केले होते. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावाने ओळखली जात असे. या जोडीने अनेक चित्रपटांना संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (1980) हा त्यांचा पहिला चित्रपट होता.


1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here