नवी दिल्ली,दि.16: लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा (EVM) मुद्दा जोरदारपणे उचलून धरला, पण निवडणूक निकाल जाहीर होताच हा मुद्दा गायब झाला. मात्र, यावर नेत्यांनी वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले. अचानक गायब झालेला मुद्दा पुन्हा चर्चेत येताना दिसत आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला आहे.
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क
यांची Xवरील पोस्ट रीपोस्ट करत राहुल गांधी एका वृत्तपत्राचा हवाला देत म्हणाले, ‘भारतातील ईव्हीएम एक “ब्लॅक बॉक्स” आहे आणि कोणालाही ते तपासण्याची परवानगी नाही. आमच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाहीची फसवणूक होते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते.’
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये मुंबई घटनेचा उल्लेख केला आहे . याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पांडिलकर यांच्यावर ईव्हीएम प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बंदी असतानाही मंगेश पांडिलकर यांनी मुंबईतील गोरेगाव निवडणूक केंद्रात मोबाईल फोन वापरल्याचा आरोप आहे.
याशिवाय, पोलिसांनी पंडिलकर यांना मोबाईल फोन दिल्याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या एका कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल केला आहे, याप्रकरणी उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या अनेक उमेदवारांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेरमतमोजणीनंतर रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मतदारसंघातून अवघ्या 48 मतांनी विजयी झाले, त्यामुळे बराच वाद झाला.