प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवावा, तो रस्त्यावर आणू नये: राज ठाकरे

0

मुंबई,दि.30: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवावा, तो रस्त्यावर आणू नये असे म्हटले आहे, ते एबीपी माझाशी बोलत होते. मशिदीवर किंवा अन्य ठिकाणी जे भोंगे लावले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समाजाला त्रास होतो. भोंगा हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय आहे. हा फक्त मशिदीवरील भोंगे असा विषय नाही. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवावा, तो रस्त्यावर आणू नये असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. एक, दोन दिवस आपण समजू शकतो मात्र, 365 दिवस जर या गोष्टी सुरु असतील तर ते योग्य नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यातील पहिला संवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याशी साधला. यावेळी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी दिलखुलास संवाद साधला.

भोंगा या विषयाकडे धार्मिक म्हणून न पाहता सामाजिक विषय म्हणून पाहावे, असे सामाजिक विषय खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. एसटीचा संपाकडे देखील आपण राजकीय समजतो पण तो काही राजकीय नाही, तो कर्मचाऱ्यांच्या पगावरवाढीच्या संदर्भात असल्याचे ठाकरे म्हणाले. इतक्या वर्षात आम्ही अजूनही बदललो नाहीत. आम्ही आजही तेच सांगत आहोत की, आम्ही रस्ते देऊ, आम्ही पाणी देऊ, वीज देऊ, शिक्षण देऊ, आरोग्य देऊ. एवढ्या वर्षात या मूलभूत समस्याच ओलांडून पुढे गेलो नसल्याचे राज म्हणाले. त्यामुळे काम करणाऱ्यांना नापास केले आणि काम न करणाऱ्यांना जर पास केले तर ही कामे होणार नाहीत असेही राज ठाकरे म्हणाले.

भोंग्याचा विषय

मी अचानक भोंग्याचा विषय काढला नाही. यापूर्वी देखील काढला होता असे राज म्हणाले. आम्ही आमच्या कानाला का त्रास करुन घ्यायचा. म्हणून हा विषय थांबला पाहिजे. एकाच धर्मियांना बंधने सांगणार का तुम्ही? असा सवालही त्यांनी केला. भोंग्याचा त्रास हा फक्त हिंदूंनाच नाही तर मुस्लिम बांधवांना देखील होतो. घरात लहान मुले, महिला असतात, वयस्कर लोक असतात, अभ्यास करणाऱ्या मुलांना याचा त्रास होतो असे राज ठाकरे म्हणाले. गणपतीच्या वेळेस ज्यावेळी लाऊडस्पीकर लावले जातात त्याचा देखील त्रास होतो. परंतू ही अॅक्शनला रिअॅक्शन असल्याचे राज म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here