मुंबई,दि.११: मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे ढग गडद झाले असतानाच, तुर्कियेने (तुर्की) उघडपणे इराणची बाजू घेतली आहे. तुर्कियेचे राष्ट्रापती रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी सर्व मुस्लिम देशांना मतभेद विसरून इराणच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
‘मी शिया नाही, सुन्नी नाही; आपण फक्त मुसलमान आहोत’
अंकारा येथे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना एर्दोगान अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसले. ते म्हणाले, “मी स्वतःला शिया किंवा सुन्नी मानत नाही, आपण सर्व प्रथम मुसलमान आहोत. सध्याची वेळ ही एकमेकांना पाठिंबा देण्याची आणि हे युद्ध थांबवण्याची आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण जग या आगीत होरपळून निघेल.”
एर्दोगान यांनी या युद्धाला इस्रायल जबाबदार असल्याचे सांगत, अमेरिकेने राजनैतिक मार्गाचा अवलंब केल्यास शांतता प्रस्थापित होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. यासाठी तुर्किये मध्यस्थाची भूमिका बजावण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इस्रायलचा तुर्कियेवर गंभीर आरोप
दुसरीकडे, इस्रायलने तुर्कियेच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. इस्रायलचे माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दावा केला की, तुर्किये आता इराणच्या मार्गावर चालत असून हमास, कतार आणि सीरिया यांच्या सोबतीने इस्रायलविरोधी गट तयार करत आहे. विशेष म्हणजे, इराणने ज्या मोजक्या देशांना लक्ष्य केलेले नाही, त्यापैकी तुर्किये एक असल्याने इस्रायलने संशय व्यक्त केला आहे.
युद्धाच्या सावटाखाली गुप्त खलबते
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी तुर्कियेने पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत. तुर्कियेचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांनी संसदेत खासदारांना ३० मिनिटांचे ‘सीक्रेट ब्रीफिंग’ देऊन या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा केली आहे.








