सोलापूर,दि.२६: मागील महिनाभरापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. या दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांना अनेक गावांत गावबंदी करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असून तशी शपथ गावकऱ्यांनी घेतली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. तो संपल्याने आता जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठिंबा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आलीय. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली.गाव बंदीचा फलक देखील गावात लावण्यात आला. त्यासोबत गावकऱ्यांनी नेत्यांना गावात येऊ न देण्याची शपथ घेतली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात आजपासून साखळी उपोषण आणि आमरण उपोषणाला सुरुवात झाली.मराठा आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही.तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात बंदी असेल अशी भूमिका तिर्हे येथील गावकऱ्यांनी घेतली आहे. यावेळी भारत जाधव,राम जाधव, गोवर्धन जगताप,नेताजी सुरवसे, विजय जाधव, गणेश पवार, बालाजी जावळे, पार्थवीर सुरवसे, शंकर घंदूरे व सकल मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.