राज्यात अन्य ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी, सोलापूर लोकसभा मतदारसंघात वाढ

0

सोलापूर,दि.8: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2024 जाहीर झालेला होता. त्यानुसार दिनांक सात मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया अत्यंत शांतपणे सुरळीतपणे पार पडली. काही किरकोळ घटना घडल्या परंतु प्रशासनाने त्यावर तात्काळ उपाययोजना करून मतदानाची प्रक्रिया सुरळीत चालू केली. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सन 2019 मध्ये 58.46 टक्के मतदान झालेले होते, त्यात सन 2024 च्या निवडणुकीत 0.73 टक्क्यांनी वाढ होऊन 59.19 टक्के मतदान झालेले आहे.

रखरखत्या उन्हातही मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर लांब लांबच लांब रांगा लावलेल्या होत्या. प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप टाकून सावलीची व्यवस्था करण्यात आलेली होती, तसेच अन्य सोयी सुविधा देण्यात आलेल्या होत्या. अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधा बाबत समाधान व्यक्त केलेले दिसून आले. मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्यासारखे वातावरण झालेले आहे जवळपास 44.4 डिग्री सेल्सिअस तापमान गेलेले होते. अशा वातावरणात ही मतदार मतदानासाठी बाहेर पडला प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर सावली पिण्याच्या पाण्याचे शुद्ध पाणी तसेच उष्णतेचा त्रास होऊन डीहायड्रेशन झाल्यास तात्काळ त्यांना ORS चे पाणी मिळावे यासाठी त्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती.

सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रावर मतदारासाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांना अतिरिक्त मोठा कर्मचारी वर्ग देण्यात आलेला होता. महापालिका हद्दीतील 772 मतदान केंद्रावर महापालिकेचे अतिरिक्त आयोग संदीप कारंजे यांनी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर नगरपालिका मतदान केंद्रावर व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सर्व पायाभूत सोयीसुविधा निर्माण करून त्याची खात्री केली व मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे नियोजन केले.

जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनीही आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याच्या पाण्याची सुविधा ORS पावडर व पाणी, दिव्यांगासाठी व्हील चेअर ची व्यवस्था, मतदार मदत कक्ष, आदर्श मतदान केंद्र हिरकणी कक्ष या सुविधांची खात्री मतदानापूर्वी जाऊन केलेली होती. आशा सर्व सोयीसुविधामुळे देशाच्या व राज्याच्या अन्य भागात मतदानाच्या टक्केवारी मध्ये कमतरता येत आहे परंतु 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघात 0. 73 टक्के वाढ झाल्याने प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या सोयी सुविधांचाही नक्कीच लाभ झाल्याचे दिसून येत आहे. मतदानात झालेली थोडीशी वाढ ही मतदाराबरोबरच प्रशासनाचेही यश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here