सोलापूर,दि.१३: नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीतही एनडीएला बहुमत मिळाले आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि सी-व्होटर यांनी मूड ऑफ द नेशन (MOTN) सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणानुसार, जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपला २८१ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ७८ जागा मिळू शकतात.
सर्वेक्षणात एकूण १ लाख २५ हजार १२३ लोकांच्या मतांचे विश्लेषण करण्यात आले. त्यात विविध वयोगट, उत्पन्न गट, शिक्षण, जात आणि शहरी-ग्रामीण लोकसंख्या यांचा समावेश होता.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या होत्या, ज्या आता कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. सर्वेक्षणानुसार जर आज निवडणुका झाल्या तर एनडीए युतीला ३४३ जागा मिळण्याची अपेक्षा आहे आणि इंडिया ब्लॉकला १८८ जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती?
जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर जनता कोणत्या नेत्याला पुढचा पंतप्रधान म्हणून पाहू इच्छिते? या प्रश्नावर, ५१.२ टक्के लोकांची पसंती नरेंद्र मोदींना आहे, तर २४.९ टक्के लोकांची पसंती राहुल गांधींना आहे. तर १.२ टक्के लोकांना अरविंद केजरीवाल यांना पुढचे पंतप्रधान होताना पहायचे आहे.
जर आज निवडणुका झाल्या तर लोकसभेत कोणाला किती मते मिळतील? सर्वेक्षणात, एनडीएला ४६.९ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे आणि इंडिया आघाडीला ४०.६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.