निवडणूक आयोगाकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर होणार कायदेशीर कारवाई

0

मुंबई,दि.27: निवडणूक आयोगाकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोणतेही बटन दाबल्यानंतर कमळालाच मत जात असल्याचे म्हणत व्हिडीओ शेअर केला होता. निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मणिपूरमधील मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान 19 एप्रिल रोजी हिंसाचार आणि तोडफोड झाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने फेरमतदान घेण्याचे आदेश दिले होते.

मणिपूरमधील या मतदारसंघात पुन्हा 22 एप्रिल रोजी मतदान पार पडलं होतं. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी याच संदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट करत कोणतेही बटन दाबल्यानंतर कमळालाच मत जात असल्याचे म्हटलं होतं. यासोबत एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता ज्यामध्ये काही महिला मतदान केंद्रावर तोडफोड करताना दिसत होत्या.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

“फेक न्यूज: येथे दिसणारा व्हिडिओ हा इम्फाळ पूर्वेतील एका मतदान केंद्रात (3/21 खुराई विधानसभा) जमावाच्या हिंसाचाराचा आहे आणि त्या मतदान केंद्रावर 22 एप्रिल 2024 रोजी फेरमतदान आधीच झाले आहे. VVPAT द्वारे आलेल्या पेपर स्लिपमध्ये आणि बॅलेट युनिटवर दाबलेल्या बटणाचे चिन्ह जुळत नसल्याचा आरोप कोणीही केलेला नाही किंवा सापडला नाही. फेक न्यूज पसरवल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जात आहे,” असे मणिपूर निवडणूक आयोगाने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मणिपूरमध्ये महिलांनी ईव्हीएम फोडल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे सत्य समोर आलं होतं. मणिपूरमधील मोइरांग कंपू येथील मतदान केंद्रावर स्थानिक लोकांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत ईव्हीएमची तोडफोड केली होती. 19 एप्रिलच्या घटनेनंतर निवडणूक आयोगाने मणिपूरमध्ये 11 मतदान केंद्रांवर झालेल्या निवडणुका रद्द घोषित केल्या आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील सात केंद्रांवर आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील चार केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे जाहीर केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here