Election Commission On NCP: राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोग धक्का देण्याच्या तयारीत

0

मुंबई,दि.22: Election Commission On NCP: राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोग (Election Commission) धक्का देण्याच्या तयारीत आहे. नुकतेच निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून फेरविचार करत असल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू देखील मांडण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे वकील सुनावणीला हजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरु असल्याची माहिती | Election Commission On NCP

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवावा का याबाबत सध्या निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच आयोगाच्या कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आपलं म्हणण मांडण्यासाठी बोलावण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार स्वतः राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे आयोगाच्या कार्यालयातून जाऊन आले आहेत. एबीपी माझाला मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक आयोगाने सध्या राष्ट्रीय दर्जा कायम ठेवण्यासाठी फेरआढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती करण्यात आल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबतच निवडणूक आयोगाच्यावतीने याआधी मायावती यांचा बसप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनाही 2019 साली निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्या वर्षीचा लोकसभा निवडणुकीतील संबंधित पक्षाची कामगिरी पाहता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेऊ नये असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार असल्याच्या बातम्या धुडकावून लावल्या आहेत. तसेच प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात गेलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची आणि निवडणुक आयोगातील अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली असून पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अबाधित राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य महाराष्ट्रासह नागालँड, केरळ आणि झारखंड या राज्यात आहेत. तसेच निवडणूक आयोगाने घातलेल्या अटी शर्थी पूर्ण करत असल्यामुळे आम्हांला अडचण नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे. मात्र आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतोय याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here