नवी दिल्ली,दि.१५: पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. या दोन्ही नेत्यांना कारणे दाखवा नोटी बजावण्यात आली आहे.
भाजपा नेत्यांनी प्रियंका गांधींविरोधात तक्रार केली होती. त्यात असं म्हटलं होतं की प्रियंका गांधींनी मध्य प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी काही वक्तव्यं केली होती. त्याला सत्याचा कुठलाही आधार नव्हता ती वक्तव्यं खोटी होती. खासगीकरणावरुन त्यांनी हे आरोप केले होते. त्यावरुन प्रियंका गांधींना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे.
त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आम आदमी पक्षातर्फे म्हणजेच आपतर्फे एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओच्या विरोधात भाजपाने तक्रार केली होती. ज्यानंतर निवडणूक आयोगाने आप या पक्षालाही नोटीस बजावली आहे. १६ नोव्हेंबरच्या दिवशी संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावं असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
आम आदमी पक्षाने नरेंद्र मोदींना टार्गेट करत चुकीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. तसंच त्यावर काही प्रतिक्रियाही दिल्या होत्या. ज्यानंतर भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी अनिल बलुनी आणि नेते ओम पाठवक यांच्यासह भाजपाच्या एका प्रतिनिधी मंडळाने निवडणूक आयोगाकडे प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्याविषयी तक्रार अर्ज दिला. या दोघांनीही केलेला उल्लेख चुकीचा आहे, निराधार आहे असं अर्जात नमूद करण्यात आलं. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.