“निवडणूक आयोगाने पुन्हा माती खाल्ली ही अतिशय गंभीर गोष्ट” संजय राऊत

0

सांगली,दि.2: निवडणूक आयोगाने पुन्हा माती खाल्ली ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीला 19 एप्रिलपासून 7 टप्प्यात सुरुवात झाली आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला पार पडले.

या मतदानानंतर निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी जाहीर करतो. मात्र आता या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. कारण निवडणूक आयोगाने ही आकडेवारी जाहीर करण्यास बराच वेळ घेतला. निवडणूक आयोगाने मंगळवारी संध्याकाळी ही आकडेवारी जाहीर केली आणि विरोधी पक्षांनी याबाबत निवडणूक आयोगावर (ECI) प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. सामान्यत: ही मतदानाची टक्केवारी 24 तासांत जाहीर केली जाते, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर 11 दिवसांनी, दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर 3 दिवसांनी आकडेवारी दिली आहे. तिथल्या सर्व मतदारसंघात अचानक 5-6टक्के मतदानात वाढ झाल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत आलंय. नांदेडला मतदान संपताना 52 टक्के मतदान होते, तिथे 62 टक्के मतदान कसे झाले?, निवडणूक आयोगानं मतदानाच्या टक्केवारीचे आकडे जाहीर केले ते धक्कादायक, 11 दिवस मतदान टक्केवारी जाहीर करायला कसे लागतात अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे.

संजय राऊत म्हणाले, डिजिटल इंडियात संध्याकाळपर्यंत किती मतदान झाले याचे आकडे आम्हाला समजत होते, पण आश्चर्य असे फक्त नागपूर मतदारसंघात अर्धा टक्के मतदान कमी दाखवलं आहे. नागपूर सोडून सगळीकडे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालीय. ही वाढ अचानक कशी झाली, हे वाढलेले मतदान कुणी केले, कुठे गेले, 11 दिवस का लागले. हा प्रश्न देशातील जनतेला प्रश्न पडलेत. भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून ते मोदी-शाह यांच्या हातातील बाहुले झालंय का असा सवाल त्यांनी केला.

निवडणूक आयोगाने पुन्हा माती खाल्ली

भाजपाला मतदान कमी पडले, त्यातून अचानक मतदानाची टक्केवारी वाढली आहे. 11 दिवसांत वाढलेले मतदान आले कुठून? मतपत्रिकेवर मतदान होत होते, तेव्हाही संध्याकाळी 7 पर्यंत आकडेवारी सांगितली जायची. यावेळी डिजिटल इंडिया त्यादिवशी संध्याकाळी आलेली आकडेवारी आणि त्यानंतर 11 दिवसांनी आलेली नवीन आकडेवारी यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा माती खाल्ली ही अतिशय गंभीर गोष्ट आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here