निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे केली बाद?

0

मुंबई,दि.26: राज्यात सध्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन संघर्ष सुरु असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचा फैसला सध्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कचेरीत आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ सुरु आहे. त्याच शिंदे गटाने ठाकरे गट बोगस प्रतिज्ञापत्र (Affidavite) तयार करत असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) धरपकडही सुरु केली होती. याच तक्रारीचा धागा पकडत निवडणूक आयोगाने कागदपत्राची पडताळणी सुरु केली. त्यामध्येच ठाकरे गटाच्या फॅारमॅटमध्ये चुका आढळल्याचं पुढारी या वर्तमानपत्राने सांगितलं आहे. फॉरमॅट चुकल्याने ठाकरे गटाची अडीच लाख कागदपत्रे बाद झाली आहेत.

ठाकरे गटाने दोन ट्रक भरुन सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे आयोगाच्या दिल्ली कार्यालयात पाठवली आहेत. त्यात आठ लाखांपेक्षा जास्त सदस्यत्वाचे अर्ज पाठवले आहेत. तर 2 लाख 62 हजार प्रतिज्ञापत्र आधीच आयोगासमोर सादर केलेली आहेत. अजूनही प्रतिज्ञापत्र भरुन घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. दिवाळीनंतर उरलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पक्षाने विहित नमुन्यात अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे पाठवली आहेत. यामध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी बुथप्रमुखांपासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंतचे अर्ज आहेत.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निवडणूक निशाणी काही काळासाठी गोठवली आहे. मात्र, पक्ष आणि चिन्हासाठीची लढाई अद्याप आयोगासमोर सुरु आहे. या लढ्याच्या अंतिम निकालानंतरच शिवसेना कुणाची याचा फैसला होणार आहे. त्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्र जमा करण्याचे काम सुरु आहे.

उद्धव ठाकरेंकडून प्रतिज्ञापत्रे जमा करण्याचे आदेश

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील आपल्या सर्व जिल्हाप्रमुखांना आणि नेत्यांना अधिकाधिक सदस्यत्व नोंदणी आणि प्रतिज्ञापत्र जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध जिल्ह्यांतील नेत्यांनी सदस्यत्व नोंदणीचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे मातोश्री आणि शिवसेना भवनात जमा केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here