भाजपा खासदार तेजस्वी सूर्याविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

0

बेंगळुरू,दि.26: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीचा प्रचार आणि राजकीय भाषणबाजी सुरूच आहे. त्याचवेळी एकापाठोपाठ एक तक्रारी निवडणूक आयोगापर्यंत पोहोचत असून, त्याची दखल घेत आयोगही कारवाई करत आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने भाजपा खासदार आणि बेंगळुरूमधील पक्षाच्या उमेदवार तेजस्वी सूर्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

निवडणूक आयोगाने शुक्रवारी सांगितले की, भाजपचे खासदार आणि बेंगळुरू दक्षिणचे उमेदवार तेजस्वी सूर्या यांच्याविरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करून धर्माच्या आधारावर मते मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांची कन्या सौम्या रेड्डी या काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध त्यांची लढत आहे. या जागेवर आज शुक्रवारी मतदान होत आहे.

कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे की, सूर्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी मतदान केल्यानंतर तेजस्वी सूर्या यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, भाजपकडे 80 टक्के मतदार आहेत, पण केवळ 20 टक्केच बाहेर येऊन मतदान करतात. काँग्रेसचे मतदार 20 टक्के आहेत पण ते बाहेर येऊन 80 टक्के मतदान करतात. बहुतांश घटनांमध्ये हेच मतदान केंद्रांचे वास्तव आहे. तुमच्या प्रत्येक मताला महत्त्व आहे. कृपया बाहेर या आणि मतदान करा. कारण तुम्ही मतदान करत नसाल तर 20 टक्के काँग्रेस नक्कीच मतदान करत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here