“राऊत आले नाहीत का?” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत विचारला प्रश्न

0

छत्रपती संभाजीनगर,दि.१६: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वेळापूर्वीच छत्रपती संभाजी नगरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. छत्रपती संभाजी नगरमध्ये आज कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी राऊत आले नाहीत का? असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी विचारला आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. मी संपादक आहे मी पत्रकार परिषदेत जाऊ शकतो असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावरुन हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. त्यावेळी एकच हशा पिकला.

काय म्हणाले होते संजय राऊत?

माझी इच्छा झाली तर मी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारायला जाईन. मी संपादक आहे आणि महाराष्ट्रातला ज्येष्ठ संपादक आहे. त्या नात्याने मला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मात्र मी जर गेलो तर गोंधळ निर्माण होईल आणि ते मला नको आहे असं संजय राऊत म्हणाले होते. ज्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी राऊतांची खिल्ली उडवत राऊत आले नाहीत का असा प्रश्न विचारला.

राऊत आले नाहीत का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राऊत आले नाहीत का? असं विचारताच पत्रकारांमध्ये हशा पिकला. त्यानंतर तुमचे ते विकास राऊत हो.. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनीही स्मित हास्य केलं.

मराठवाड्यातल्या संभाजी नगरमध्ये जी पत्रकार परिषद पार पडली त्याचा पास संजय राऊत यांनाही मिळाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे ते पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील का? असाच प्रश्न होता. मात्र ते पत्रकार परिषदेला आले नाहीत. त्यामुळे शिंदे यांनी विचारलेला हा प्रश्न चर्चेत राहिला आहे. आज मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने ५९ हजार कोटींची घोषणा केली. या पॅकेजमध्ये नदीजोड प्रकल्पाच्या १४ हजार कोटींचाही समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here