Eknath Shinde: एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री, आज एकनाथ शिंदेंचा शपथविधी संध्याकाळी 7:30 वाजता

0

मुंबई, दि.30: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून आज संध्याकाळी सात वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल.

मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील असं जाहीर केलं आहे. आज संध्याकळी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.”

एकनाथ शिंदे यांच्या सरकारला भाजप बाहेरून पाठिंबा देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आजच भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळं आज रात्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबच शिक्कामोर्तब झाला आहे. आज राजभवनावर जाऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकार बनवण्याचा दावा करतील. दरम्यान या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

देवेंद्र फ़डणवीस म्हणाले की, “गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे बहुमत झुगारलं आणि हिंदुत्वाच्या विरोधात विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला. या अडीच वर्षाच्या काळात या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला, या सरकारचे दोन मंत्री तुरुंगात जाणं हे खेदजनक आहे. एकीकडे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरून काढण्यात आलं नाही. शेवटच्या दिवशी जाता जाता या सरकारने संभाजीनगर हे नामांतर केलं. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही, पण ती घेतली.”

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजपानं 105 जागा आणि शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. जवळपास 161 युती आणि अपक्ष मिळून 170 बहुमत आमच्याकडे होते. भाजपा-शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा केली होती. परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि त्यांचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला. विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपाला बाहेर ठेवले. हा खरेतर जनमताचा अपमान होता. जनतेचा कौल भाजपा-शिवसेनेला होता. परंतु त्याचा अपमान करून महाविकास आघाडी अस्तित्वात आली असं त्यांनी सांगितले.  

भाजपाने मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला
एकनाथ शिंदे म्हणाले, “भाजपाकडे 120 चं संख्याबळ आहे. असं असताना मुख्यमंत्रीपद तेही घेऊ शकले असते. मात्र, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. यासाठी मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी यांचे आभार मानतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे. कुणाला काही मंत्रीपद पाहिजे असं काही नव्हतं. जे घडलं ते तुमच्यासमोर होतं.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here