अयोध्या,दि.९: अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (९ एप्रिल) रामलल्लांचं दर्शन घेतलं. तसेच या दर्शनानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटावर हल्लाबोल केला. शिंदे म्हणाले की, काही लोकांना आमच्या या अयोध्या दौऱ्याची अॅलर्जी होती, अनेकांना या दौऱ्यामुळे त्रासही झाला. कारण त्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. हे लोक हिंदू धर्माबद्दल चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटतं की, हिंदूत्व जर लोकांच्या मनामनात पोहोचलं तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील. या भितीपोटी ते हिंदुत्वाला विरोध करत असतात.
‘…म्हणून मी एवढं मोठं ऑपरेशन केलंय’ एकनाथ शिंदे
दरम्यान, एका माध्यम प्रतिनिधीने एकनाथ शिंदे यांना सवाल केला की, तुम्ही नुकतेच डॉक्टर झाला आहात (अलिकडेच एकनाथ शिंदे यांना डी लिट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे) मग आता तुम्ही हिंदुत्वाची अॅलर्जी असणाऱ्या लोकांवर उपचार कसे करणार आहात? त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, डॉक्टरकीच्या डिग्रीचं सोडा, मी आधीपासूनचं डॉक्टर होतो, म्हणून मी एवढं मोठं ऑपरेशन केलंय आणि या लोकांना ऑपरेशनची गरज नाही, छोट्या-मोठ्या गोळ्यांनी यांचं काम होतं.
शिंदे म्हणाले की, आम्ही (भाजपा-शिवसेना) २०१४ मध्ये हिंदुत्वाचा विचार घेऊन सरकार बनवलं. २०१९ मध्येही तेच होणार होतं. परंतु स्वार्थ आणि खुर्चीच्या लोभामुळे त्यांनी (उद्धव ठाकरे) चुकीचं पाऊल उचललं. मात्र आठ महिन्यांपूर्वी आम्ही (शिंदे गट) ती चूक सुधारली.