एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी भाजपाला दिला जागा वाटपाचा प्लान

0

मुंबई,दि.10: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी भाजपाला ॲडजस्टमेंट (तडजोडीचा) प्लान दिला असल्याचे वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. महाराष्ट्रातील लोकसभा जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाही. भाजपाने आपल्या पहिली उमेदारांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातील एकही उमेदवार जाहीर केला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच जागा वाटपावर दिल्लीत बैठक झाली.

भाजपा महाराष्ट्रात जास्त जागा लढवण्याच्या तयारीत आहे. मित्र पक्षांना भाजपा 11 ते 16 जागा सोडण्यास तयार आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 13 खासदार आहेत. शिंदे गट 18 जागांची मागणी करत होता. तर अजित पवार गट 9 जागांची मागणी करत होता. मात्र भाजपा इतक्या जागा सोडण्यास तयार नाही.

भाजपकडून शिंदेंना 9, तर अजित पवारांना 4 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. प्रत्यक्षात त्यांची मागणी अनुक्रमे 18 आणि 9 जागांची होती, अशी माहिती सुत्रांनी दिली. तुम्हाला अतिरिक्त जागा दिसल्यास तिथे पराभवाची जोखीम असेल, असं भाजप नेतृत्त्वाकडून शिंदे, अजित पवारांना सांगण्यात आलं.

शिंदेंसोबत 13 खासदार आहेत. पण त्यांना तितक्या जागा सोडायला भाजपा तयार नाही. अजित पवारांनादेखील हव्या तितक्या जागा सोडण्याची भाजपाची तयारी नाही. अमित शाहांचा आक्रमक पवित्रा आणि ठाम भूमिका पाहून मित्रपक्षांनी त्यांना ॲडजस्टमेंट प्लान सुचवला. ‘काही जागांवर आम्ही आमच्या पक्षाकडून सक्षम उमेदवार देतो. तुम्ही त्यांना कमळाच्या चिन्हावर लढवा. त्यामुळे महायुतीमधील एकता टिकून राहिली,’ असा प्रस्ताव मित्रपक्षांनी दिला. भाजपानं हा प्रस्ताव स्वीकारला असून त्यावर फीडबॅक देण्याचं आश्वासन दिलं आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here