राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा शिंदे गटातील मंत्र्यांबाबत मोठा दावा

0

मुंबई,दि.११: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटातील मंत्र्यांबाबत मोठा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ मे रोजी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे.

“शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवलं पाहिजे, अशी भूमिका भाजपाच्या हायकमांडने घेतली आहे. त्यात मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे,” असं मोठं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे काय म्हणाले?

‘एबीपी माझा’शी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, “भाजपा आणि शिवसेनेतील मतभेद बऱ्याच ठिकाणी समोर येत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांना हटवलं पाहिजे, अशी भूमिका भाजपाच्या हायकमांडने घेतल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आहेत. हे पाचही मंत्री निष्क्रिय आहेत, असं भाजपावाल्यांना वाटत आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांची काम मंत्री करत नाही. त्यामुळे त्यांच्यात मतभेद आहेत.”

“त्यात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे. जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्णत्वास गेलं नाही. या कामात गैरव्यवहार झाला आहे. याचे अहवाल दिल्लीतील वरिष्ठांकडे गेलेले आहेत. त्यामुळे गुलाबराव पाटलांना हटवलं पाहिजे, अशी भूमिका भाजपाच्या वरिष्ठांनी घेतली आहे,” असेही एकनाथ खडसेंनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here