Eknath Khadse On Nawab Malik: “नवाब मलिक हे जर भाजपात गेले तर तिथे जाऊन…” एकनाथ खडसे

0

मुंबई,दि.११: Eknath Khadse On Nawab Malik: नवाब मलिक हे जर भाजपात गेले तर तिथे जाऊन स्वच्छ होऊन ते बाहेर येतील. असे वक्तव्य एकनाथ खडसेंनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अखेर न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांचा जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना दोन महिन्यांसाठी हा जामीन दिला आहे.

अंडरवर्ल्डशी संबध असल्याचं कथित प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात २३ फेब्रवारी २०२२ रोजी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. परंतु, किडनी संबंधित असलेल्या दुर्धर आजाराशी मलिक यांना ग्रासलं आहे. त्यावरील उपचारांसाठी मलिक यांना जामीन मिळावा अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी केली होती. यावर ईडीकडून महाधिवक्ता तुषार मेहता यांनीही विरोध दर्शवला नाही.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या जामीनावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. नवाब मलिक जामीन मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जातील किंवा थेट भारतीय जनता पार्टीत जातील, अशाही चर्चा सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि आणि आमदार एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, “शरद पवार यांचे नवाब मलिक यांच्यावर खूप उपकार आहेत. पवार यांनीच त्यांना राजकारणात अनेक संधी दिल्या आहेत. मलिक यांनीही खूप उत्तम काम केलं आहे. त्यामुळे मला वाटतं की नवाब मलिक हे शरद पवार यांच्याबरोबर राहतील.” एकनाथ खडसे हे जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नवाब मलिक हे जर भाजपात गेले तर तिथे जाऊन… | Eknath Khadse On Nawab Malik

नवाब मलिक यांना भाजपाकडून ऑफर असल्याची चर्चा सुरू आहे. यावर काय सांगाल असा प्रश्न खडसे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ही गोष्ट येणारा काळच सांगू शकेल. यात एक गोष्ट मात्र नक्की आहे की नवाब मलिक हे जर भाजपात गेले तर तिथे जाऊन स्वच्छ होऊन ते बाहेर येतील. त्यामुळे एखाद्या वेळेस भाजपा त्यांना ऑफर देऊ शकते. कारण भारतीय जनता पार्टीकडे लोकांना स्वच्छ करण्याची मशीन आहे.

वॉशिंग मशीनपेक्षाही भारी मशीन

एकनाथ खडसे म्हणाले, भारतीय जनता पार्टीकडे वॉशिंग मशीनपेक्षाही भारी मशीन आहे. त्या मशीनमध्ये जर माणूस घातला तर तो स्वच्छ होतो. तो माणूस कितीही घाणेरडा असला, भ्रष्ट असला तरी तो त्यात घातला की स्वच्छ होतो, प्रामाणिक होतो. मग हे लोक (भाजपा नेते) त्या माणसाचं, त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करतात, त्याला मंत्रिमंडळात स्थान देतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here