ईडीची पुढची कारवाई या काँग्रेसच्या नेत्यावर? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी दिला संकेत

0

नांदेड,दि.१९: महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सरकार स्थापन केल्यापासून शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सीबीआय, आयटी, इडीमार्फत छापे टाकले जात आहेत. तर काँग्रेसच्या नेत्याशी संबंधित व्यक्तींवरही छापे टाकले जात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi) स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेते ईडीच्या रडारवर असताना आता ईडीची पुढची कारवाई काँग्रेस नेत्यांवर होणार असल्याची चर्चा आहे. तसं संकेतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant patil) यांनी दिले आहेत.

चंद्रकांत पाटील हे नांदेडमध्ये देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात एका आयकर विभागाने धाड टाकली होती. ईडी किंवा आयकर विभागाची कारवाई नांदेडच्या नेत्यावर होणार का?, असा सवाल माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी सूचक हास्य करत अप्रत्यक्षपणे तसे संकेतच दिले आहेत.

महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाया सुरू आहेत. ईडी आणि प्राप्तीकर विभागाकडून धाडसत्र सुरू आहे. अशीच कारवाई नांदेडमध्ये देखील होणार का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी स्मित हास्य केलं. शिवाय, मी काही त्या तपास यंत्रणेचा अधिकारी नाही. पण माझ्या हसण्यावरून तुम्ही समजून घ्या, असं सूचक उत्तर त्यांनी दिलं आहे. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे चंद्रकांत पाटलांनी अप्रत्यक्षपणे बोट केलं असल्याची चर्चा आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here