मुंबई,दि.७: गेल्या काही दिवसांत सोलापूर, मुंबईसह राज्यातील इतर शहरांत वायू प्रदूषणातही वाढ झाली आहे. ज्यामुळे हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून, त्यांच्याकडून याबाबतची एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. वायू प्रदूषणाने राज्यातील १७ शहरांना विळखा घातला असून आरोग्यावर परिणाम करणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. हवेमध्ये धूलिकण वाढल्याने आरोग्य विभागाने मास्क घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तर सरकारनेही नागरिकांना खबरादारीचा सल्ला दिला आहे. मास्क वापरणे, मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी घराबाहेर चालायचे टाळणे, सकाळी आणि संध्याकाळी घराचे दरवाजे खिडक्या न उघडणे, बाहेर पडायचे असल्यास दुपारी १२ ते ४ या वेळेतच बाहेर जाणे, लाकूड, कोळसा आणि अन्य ज्वलनशील गोष्टी जाळायचे टाळणे आणि दिवाळीत फटाके फोडणे टाळणे अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ही नियमावली सोलापूर, मुंबई, नाशिक, अमरावती, सांगली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, अकोला, बदलापूर, उल्हासनगर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, चंद्रपूर आणि नवी मुंबई या शहरांसाठी लागू करण्यात आली आहे.
 
            
