नवी दिल्ली,दि.21: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान घेण्यात आले. देशाचे नवे राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. 18 जुलैच्या मतदानात संसदेत 728 जणांनी मतदान केले. त्यात 719 खासदार आणि 9 आमदारांचा समावेश होता. या आमदारांना संसद भवनात मतदान करण्याची परवानगी मिळाली होती.
राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. द्रौपदी मुर्मू या 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे.
विशेष म्हणजे 15 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्या देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषवलं. त्यानंतर आता द्रौपदी मुर्मू यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे.
देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अधिकाधिक पाठिंबा मिळावा म्हणून मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांनी देशभर दौरे केले होते. मात्र या निवडणुकीमध्ये मुर्मू यांचा विजय झाला. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता
17 खासदारांची मतं फुटली
राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत देशभरातील एकूण 17 खासदारांची मतं फुटली आहेत. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केला. परिणामी मुर्मू शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि त्यांचा विजय झाला.