Shivsena On Home minister: दिलीप वळसे पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

0

मुंबई,दि.1 एप्रिल 2022: Shivsena On Home minister: शिवसेनेची गृहखात्याबद्दल नाराजी असल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. गृहखातं भाजपबद्दल ‘सॉफ्ट’ असल्यानं शिवसेना नाराज असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना भाजपाबाबत आक्रमक भूमिकेत आहे, मात्र राष्ट्रवादीकडे गृहखाते आहे, मात्र राष्ट्रवादीची भाजपाबद्दल सॉफ्ट भूमिका दिसत असल्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाराजी व्यक्त केली होती.

शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीकडे असलेलं गृहखातं सेनेला मिळावं, अशी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भावना आहे. गृहखातं भाजपबद्दल सॉफ्ट असल्यानं शिवसेनेची तीव्र नाराजी असल्याची माहिती मिळत आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चौकशा सुरू असताना, ईडीचं धाडसत्र सुरू असताना राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये तासाभरापासून चर्चा सुरू आहे.

भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यात गृहखातं कमी पडत असल्याची शिवसेनेची भावना आहे. प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या प्रकरणात कारवाई न झाल्यानं शिवसेनेची नाराजी असल्याचं बोललं जात आहे. किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर यांच्यावर गंभीर आरोप होऊनही कुठलीही कारवाई न झाल्यानं शिवसेनेचे नेते नाराज आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना गृहमंत्रालयाच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा असताना मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची अदलाबदली केली जाऊ शकते, असं विधान केलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची केली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चा मी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ऐकली होती, असं मुनगंटीवार म्हणाले.

शिवसेना, मुख्यमंत्री ठाकरे गृह मंत्रालयावर नाराज असल्याचं समजतं. पण त्यांना गृह मंत्रालय का हवंय, हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. ‘महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी, गैरव्यवहार करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी शिवसेनेला गृहमंत्रिपद नकोय. त्यांना सूडाचं राजकारण करायचंय. भाजपच्या नेत्यांना अडकवायचं आहे. त्यासाठीच त्यांना गृहमंत्रालय हवं आहे,’ असा आरोप त्यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here