सोलापूर,दि.9: मतदारांनी तो माझा पाहुणा आहे, माझा मित्र आहे म्हणून कोणालाही मतदान करू नये. तसे केले तर मतविभागणी होऊन याचा फायदा भाजपला होईल. जात धर्माच्या नावावर भांडणे लावून ते निवडणूक जिंकत आहेत. असे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी म्हटले आहे. त्यांचा गावभेट दौरा सुरू आहे. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोणतीच विकासकामे झाली नाहीत. असे काडादी म्हणाले.
लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाचि विकास साधणे अपेक्षित असताना जनतेच्या हिताला बांधणारे कृत्य त्यांच्या हातून सातत्याने घडत आहे. सार्वजनिक संस्थेला त्रास देऊन ते बंद पाडण्याचे कारस्थान ते करीत आहेत. शेतकरी बांधवांचे श्रमाचे मंदिर आणि अस्मिता असणाऱ्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा पाप भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केले आहे. त्यामुळे दक्षिणच्या अस्मिताला आणि स्वाभिमानाला ठेच पोचविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत धडा शिकवणे गरजेचे आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून त्यांना बाजूला करा आणि ‘दक्षिण’चा स्वाभिमान त्यांना दाखवून द्यावा असे आवाहन धर्मराज काडादी यांनी केले.
काय म्हणाले सुरेश हसापुरे?
काँग्रेस नेते सुरेश हसापुरे म्हणाले, धर्मराज काडादी हे स्वच्छ प्रतिमेचे आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व आहेत. राजकारणापासून काडादी दूर होते आम्ही सगळ्यांनी आणि जनतेने आग्रह केल्यामुळे ते राजकारणात उतरले आहेत. जातीपातीचे आणि सूडाचे राजकारण करणाऱ्या भाजपला बाजूला करण्यासाठी आम्ही काडादी हा सक्षम पर्याय जनतेला दिला आहे. तेव्हा जनतेनी काडादी यांच्यासारख्या उच्चशिक्षित स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तिमत्त्वाला निवडून द्यावे. आम्ही निश्चितच सर्वजण मिळून तुमचे प्रश्न सोडवू असे हसापुरे म्हणाले.
काय म्हणाले बाळासाहेब शेळके?
काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके म्हणाले, आज दक्षिण सोलापूरची अवस्था बिकट झाली आहे. कोणी येतोय आणि टिकली मारून जात आहे. त्यामुळे जनतेनी किमान या निवडणुकीत तरी जागृतपणे मतदान करणे गरजेचे आहे धर्मनिरपेक्ष विचार जपणारे, सर्वांना सोबत घेऊन जाणारे स्वच्छ प्रतिमेचे धर्मराज काडादी यांना निवडून देणे गरजेचे आहे.
काय म्हणाले राजशेखर शिवदारे?
स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे म्हणाले, काडादी परिवार गेल्या अनेक वर्षापासून सिद्धेश्वर परिवारातील संस्था उत्तमरीत्या चालवित असून या संस्थाचा त्यांनी मोठा विस्तार केला आहे.नेहमीच त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य जनतेची कामे केली आहेत. निष्कलंक निगर्वी आणि आदर्श व्यक्तिमत्व असणारे काडादी यांच्यासारखे व्यक्ती आमदार होणे ही काळाची गरज आहे. तेव्हा त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.