Dharmraj Kadadi: श्री सिध्देश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांचा मोठा निर्णय

0

सोलापूर,दि.17: Dharmraj Kadadi: श्री सिध्देश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राजकारण आपला पिंड नाही मात्र वेळ आली तर कामगार, शेतकरी आणि सभासद यांना विश्वासात घेऊन राजकारणात उतरू. मीच राजकारणात यावे असे काही नाही, योग्य माणसाला पुढे आणू असे धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. शेतकरी मालक असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी गुरुवारी पाडण्यात आली. चिमणी पाडण्यात आल्यानंतर सोशल मीडियातून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

धर्मराज काडादी यांचा मोठा निर्णय | Dharmraj Kadadi

महाराष्ट्रात ऊस गाळपाचा आदर्श निर्माण केलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे कटकारस्थान चारवेळा आमदार आणि मंत्रिपद भोगलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधीनेच केले आहे असे सांगून येणाऱ्या निवडणुकीत या विकृत मनोवृत्तीच्या लोकप्रतिनिधीला धडा शिकवण्यासाठी वेळ पडली तर राजकीय मैदानात उतरण्याची तयारी करावी लागेल, असे प्रतिपादन श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी शुक्रवारी ‘गंगा निवास’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.

कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी गुरुवारी दुपारी महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या बंदोबस्तात पाडली. महापालिकेच्या या कारवाईचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असून चिमणी पाडण्याला जबाबदार असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आमदारांचा निषेधही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काडादी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

Dharmraj Kadadi

अप्पासाहेब काडादी यांनी पन्नासवर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या विकासासाठी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या सहकार क्षेत्रात या कारखान्याने नावलौकिक प्राप्त केला आहे.

अशा या कारखान्याची चिमणी विमानसेवेला आडवी येते असे कारण पुढे करून पाडण्यात आली. या चिमणीला बांधकाम परवाना नाही असे सांगत महापालिका प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून ती उदध्वस्त केली. यामुळे सोलापूरचा सहकारी तत्त्वावरील कृषी औद्योगिक प्रकल्प उदध्वस्त करण्यात आला आहे, असे काडादी म्हणाले.

चिमणी पाडण्याला भाजपचे स्थानिक आमदार जबाबदार आहेत असे सांगून ते म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रात व्यक्तिगत राग, द्वेष याला महत्त्व दिले जाऊ नये. समाजाच्या कल्याणाचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. परंतु जे चांगले चाललेले आहे ते बघवत नसल्याने त्यामध्ये आडकाठी आणण्याचे, त्रास देण्याचे काम गेल्या दहा-बारा वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. चिमणीबाबत अत्यंत घाणेरडे राजकारण करण्यात आले. या राजकारणानेच कारखान्याचा बळी घेतला आहे. लोकप्रतिनिधींनी नवे उद्योग आणून शहराचा विकास केला पाहिजे. परंतु इथले लोकप्रतिनिधी चांगले उद्योग बंद पाडण्याचा आपला ‘नवा उद्योग’ करत असतील तर ते खेदजनक आहे.

आणि बोरामणीचा विषय मागे पडला

2013 साली विमान प्राधिकरणानेच होटगी रोडवरील विमानतळ अडचणीचे असल्याचे म्हटले होते. एका बाजूला कारखाना आणि दुसऱ्या बाजूला सोलापूर शहर आहे. धावपट्टी कमी लांबीची आहे. त्यामुळे या विमानतळाची जमीन विकून तो पैसा बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी लावावा असा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे बोरामणीला जमीन खरेदी करण्यात आली. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे मंत्री असताना त्यांनी याला मान्यता दिली आणि 70 कोटी रुपये निधीदेखील मिळवून दिला. या विमानतळाच्या कामाला सुरुवातही झाली होती. परंतु 2014 मध्ये राज्यात सरकार बदलले. भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि बोरामणी विमानतळाचा विषय मागे पडला, अशीही माहिती काडादी यांनी दिली.

दीड हजार कोटींचे नुकसान | Dharmraj Kadadi On Shri Siddheshwar Sugar Factory

चिमणी पाडल्यामुळे जवळपास दीड हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारखाना जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत तो आणखी वाढणार आहे. प्रत्यक्ष चिमणीसाठी दोन ते अडीच कोटी खर्च झाला होता. बॉयलर, टर्बाइन यासाठी जवळपास शंभर कोटी लागले आहेत. विस्तारित प्रकल्पावर मोठा खर्च करण्यात आला होता, अशी माहिती काडादी यांनी दिली. चिमणी पडल्यामुळे फक्त वीजनिर्मिती बंद होते, गाळप हंगाम चालू होऊ शकतो असे म्हणणाऱ्यांच्या बुध्दीची कीव करावी वाटते. तांत्रिक ज्ञान नसलेले लोकच अशी भाषा बोलू शकतात. त्यांचे या क्षेत्रातील अज्ञानच यानिमित्ताने स्पष्ट झाले, असेही काडादी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here