Home महाराष्ट्र “ताकाला जाऊन भांडं लपवणार नाही…” धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

“ताकाला जाऊन भांडं लपवणार नाही…” धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

0

परळी,दि.१६: माजी मंत्री आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांनी एका जाहीर कार्यक्रमात आपल्या मनातील खंत आणि संताप उघडपणे बोलून दाखवला आहे. त्यांचे हे खळबळजनक भाषण सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरले असून त्याचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या ‘नाथ प्रतिष्ठान’च्या (Nath Pratishthan) वतीने मराठा भवन उभारणीसाठी परळीत २८ गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बद्दल कृतज्ञता म्हणून ‘मराठा युवा मंच’च्या वतीने आमदार मुंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात (Felicitation Ceremony) बोलताना त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे कडाडून प्रहार केला.

“मला लाथा मारून हाकलण्याचा प्रयत्न झाला…”

आपल्या राजकीय प्रवासातील संघर्षावर थेट भाष्य करताना धनंजय मुंडे म्हणाले, “मी नेहमीच जात-पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण (Politics) केले आहे. पण असे असूनही मला लाथा मारून हाकलून लावण्याचा, म्हणजेच प्रवाहातून संपवण्याचा प्रयत्न झाला. जे सत्य आहे ते मी उघडपणे बोलतो, ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा माझा स्वभाव नाही. जे माझ्या डोक्यात असते, तेच माझ्या ओठावर असते.” मराठा भवनाच्या कामाविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, परळीत होत असलेले ‘एग्रीकल्चर कॉलेज’चे (Agriculture College) काम जसे पुढील ५० वर्षांचा अंदाज घेऊन केले जात आहे, त्याच धर्तीवर हे मराठा भवन देखील अत्याधुनिक स्वरूपात विकसित करून दिले जाईल.

‘तुम्ही जेवढा जीव लावला, त्याचे माझ्यावर उपकार आहेत’

उपस्थितांना संबोधित करताना मुंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जे सलोख्याचे वातावरण होते, तेच महाराष्ट्रात अनेक वर्षे राहिले. मधल्या काळात काही अनपेक्षित गोष्टी घडल्या, मात्र आता त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. मराठा समाजाच्या भावनांचा विषय माझ्यासाठी नेहमीच आत्मीयतेचा राहिला आहे. तुम्ही सर्वांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. मधला दोन-तीन वर्षांचा काळ सोडला, तर तुम्ही मला नेहमीच आपला मानले. तुम्ही माझ्यावर जेवढा जीव लावला, त्याचे माझ्यावर उपकार आहेत. त्या कठीण काळातही माझ्या कर्तव्यात आणि कामात कधीच बदल झाला नाही.”

“माझा नियतीवर पूर्ण विश्वास, म्हणून दीड वर्ष शांत होतो”

गेल्या काही काळातील आपल्या शांततेमागचे गुपित सांगताना आमदार मुंडे म्हणाले, “यापूर्वी समाजाच्या अनेक महत्त्वाच्या बैठका गार्डनमध्ये (Garden) घ्याव्या लागत होत्या, हे चित्र मला लोकप्रतिनिधी म्हणून बघवत नव्हते. समाजजीवनात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा आंदोलने (Agitations) ही तात्पुरत्या स्वरूपाची असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेली चुकीची भावनाही तात्पुरतीच असते. आज ना उद्या सत्य काय आहे ते समोर येतेच. म्हणूनच मी गेल्या दीड वर्षांपासून शांत होतो. माझा नियतीवर (Destiny) दृढ विश्वास आहे. जर माझी नियत साफ असेल, तर माझ्याबद्दल झालेला कोणताही गैरसमज नियतीच दूर करेल, हा मला विश्वास होता आणि आज नियतीनेच ही सुंदर वेळ आणली आहे.”

तालुका पातळीवरील पहिलेच भव्य ‘मराठा भवन’

“तालुका पातळीवर तब्बल २८ गुंठ्यांच्या विस्तीर्ण जागेवर उभारले जाणारे हे पहिलेच भव्य ‘मराठा भवन’ (Maratha Bhavan) असणार आहे. या वास्तूची एक-एक वीट रचण्यापासून ते इमारत पूर्ण होईपर्यंत कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली जाणार नाही. ही संपूर्ण जबाबदारी मी तुमच्या साक्षीने स्वीकारतो,” अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, “निवडणुकीत (Elections) कोणी विरोध केला तरी, निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी हा संपूर्ण मतदारसंघातील जनतेचा असतो. समाजातील अल्पभूधारक आणि गरजू नागरिकांच्या मुलांसाठी हे मराठा भवन एक ‘शैक्षणिक मंदिर’ ठरेल, याचा मला मनस्वी आनंद आहे,” असेही त्यांनी शेवटी नमूद केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.