देवेंद्र फडणवीस यांचे फटाके भिजले त्यामुळे त्याचा आवाज नाही आला : नवाब मलिक

0

मुंबई,दि.9: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फटाके भिजले त्यामुळे त्याचा आवाज नाही आला असे राष्ट्रवादीचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावर म्हटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डच्या संबंधांबाबत केलेले आरोप मलिक यांनी फेटाळून लावले आहेत. मालमत्ता खरेदी प्रकराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस हे राईचा पर्वत बनवत आहेत. त्यांनी कुठेही जावे आम्ही तयार आहोत. असत्याचा डोलारा उभा करून कोणाची प्रतिमा मलीन होईल, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गैरसमजात आहात. मालमत्ता खरेदी व्यवहाराची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत, असे सांगत मलिक यांनी जमीन खरेदीचा व्यवहार नेमका कोणामध्ये आणि कसा झाला याची माहिती दिली आहे.

अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या फडणवीसांच्या आरोपावर मलिक म्हणाले, “देवेंद्रजी आपण १९९९ मध्ये या (मुंबई) शहरात पहिल्यांदा आमदार बनून आले. ६२ वर्षाच्या आयुष्यात या शहरात तुमच्याआधी दिवंगत मुंडे साहेब होते जे दाऊद सोबत लोकांना जोडत होते. आम्ही मंत्री होतो तेव्हा सुद्धा मुंडे साहेबांचे भाषण विधानसभेत होत असत. मात्र एवढ्या वर्षात आमच्यावर कोणी आरोप लावू नाही शकलं. आज एका जागेसंदर्भात काही कागदपत्र तुम्ही लोकांसमोर ठेवले. कवडीमोल जमीन आम्ही माफियांकडून खरेदी केली, असा आरोप तूम्ही केला. मात्र तुम्हाला माहिती देणारे कच्चे खिलाडी आहेत.”

फडणवीस यांनी आरोप केला की त्या जमिनीवर बनावट भाडेकरू तयार केले गेले. त्या जागेवर मदिरातुल अमान नावाची हाउसिंग सोसायटी आहे. 1984 मध्ये तेथे इमारत बनली. गोवावाला कंपाउंड नावाने ओळखली जाते. ज्यात मुनीरा पटेल यांनी रस्सीवाला यांना विकासाचे अधिकार देत सुमारे 140 ते 150 सर्वसामान्यांना ते विकले. आजही ती सोसायटी तेथे आहे. त्याच्या मागे झोपडपट्टीचा भाग आहे. तेथे एक आमचे गोदाम आहे. ते सॉलिडस कंपनीच्या 30 वर्षांपूवी ते मुनीरा यांच्याकडून लीजवर आहे. पुढे त्याच मालमत्तेत 4 दुकान होते.

मी तेथील भाडेकरू होतो. मुनीरा यांनी संपर्क करून गोदामाची संपूर्ण मालकी देऊ इच्छित असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही ती मालकी घेतली. त्यांचा पॉवर ऑफ ॲटर्नी सलीम पटेल त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन करून घेतले. ती सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. आम्ही सर्व स्टॅम्प ड्युटी भरली. त्याचे सर्व पुरावे आहेत, असे मलिक यांनी सांगितले.

सरदार वली खान याचा उल्लेख करत याचा संबंध आमच्याशी जोडण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. त्या कंपाउंडमध्ये वली खानचे घर आजही आहे. त्याचे वडील गोवावाला कुटुंबीयांच्या वॉचमेनप्रमाणे काम करत होते. जेव्हा आम्ही गोवावालाकडून मालमत्ता घेतली, तेव्हा 300 मीटरपर्यंत सरदार वली खान यांनी आपले नाव चढवले होते. जेव्हा मालमत्तेची नोंदणी करायला गेलो तेव्हा आम्ही 300 मीटरचे पैसे देऊन त्यांनी त्यांचा हक्क निर्माण केला होता तो विकत घेतला. आजही आमच्या घराच्या मागे ती सर्व जागा आहे. आमचे गोदामही तेथे आहे.

जी पुढे इमारत आहे त्या इमारतीत आमची चार दुकाने आहेत. ती भाड्याने दिलेली आहेत. तेव्हाही ती होतीच. मालमत्ता घेतली तेव्हा गोवावाला इमारतीत 8 दुकाने आणि 8 घर ही सर्व मालमत्ता आमची झाली. यात कोणत्याही पद्धतीने अंडरवर्ल्डच्या दबावाने किंवा बॉम्बस्फोटाशी संबंधित व्यक्तीकडून आम्ही ही मालमत्ता खरेदी केलेली नाही, असे मलिक यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here