सोलापूर,दि.१८: Devendra Fadnavis Solapur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सोलापुरात मोठे विधान केले आहे. शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी समांतर जलवाहिनी झाली. जलवितरण वाहिनीसाठी ८५० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता दिली. रस्ते चांगले झाले आहेत. विमानसेवा सुरू झाली. आता आयटी पार्कसाठी चांगली जागा सोधा, एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी उद्योग उभारू, असे सांगत सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
रविवारी, दहिटणे येथे राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था व सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असंघटिन कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील सदनिकांचा हस्तांतर समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहरात उद्योगासाठी आवश्यक रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने औद्योगिक विकासावर आता भर देण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि येथे आयटी उद्योग आणण्यात येतील. सोलापूरमध्ये चंद जलवाहिनीने पाणी आणण्यात आले आहे. सांडपाणी प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न दूर करण्यात आला असून ते कामही सुरू करण्यात आले आहे.