सोलापूर जिल्हा दौरा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

0

सोलापूर,दि.4: सोलापूर जिल्हा दौरा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेले श्री क्षेत्र अरणचा तीर्थक्षेत्र म्हणून पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. परंतु या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार केला जात आहे. यासाठी आवश्यक असलेला सर्व निधी राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे. परंतु या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यातील 100 कोटीचा पहिला हप्ता आपण आज मंजूर करत असून या तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

श्रीक्षेत्र अरण तालुका माढा येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा व भक्तनिवास वास्तुशिल्प भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार सर्वश्री राम शिंदे, जयकुमार गोरे, राम सातपुते, योगेश टिळेकर, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम कांडगे, बळीराम शिरस्कर, संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रविकांत महाराज वसेकर, प्रभू महाराज माळी, महामंडलेश्वर मनीषानंद महाराज यांच्यासह सावता महाराज यांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडवणीस पुढे म्हणाले की, संत सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती मार्गावर चालण्याचा एक वेगळा विचार दिला तसेच समाजाला एकसंघ ठेवण्याचे कार्य केले. आपल्या कर्मात मग्न असलेल्या सावता महाराजांना भेटण्यासाठी पंढरपूर येथून विठूरायाची पालखी अरण येथे येते ही ही घटना खूप महत्त्वाची आहे व 1295 मध्ये अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज यांनी संजीवन समाधी घेतली. शेकडो वर्षापूर्वी सावता महाराजांनी मांडलेले विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहेत, असे त्यांनी सांगितले.

आजच्या समाजाला ही संतांच्या विचारांची नितांत गरज आहे. आपल्या राज्यातील समाज जाती-जातीमध्ये विखंडित होत आहे. मताच्या राज कारणामुळे समाजामध्ये दरी निर्माण होत आहे. सर्वांना सोबत घेऊन एकसंघ समाज निर्माण करण्याचे जी संतपरंपरेची विचारसरणी होती ती विचारसरणी  अंगीकरणाची गरज आहे त्यातूनच एक सुदृढ समाज निर्माण होऊ शकेल, असे मत उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देण्यासाठी संत शिरोमणी सावता महाराजांचे  मराठीत लिहिलेले अभंग महत्वपूर्ण पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले.  

पुणे येथील भिडे वाडा केस राज्य शासनाने जिंकलेली असून या वाड्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील कामाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल असे माहिती फडणवीस यांनी दिली. राज्य शासनाने विविध शासकीय योजना महिला व मुलीसाठी सुरू केलेल्या आहेत. उच्च शिक्षणात क्रांतिकारी निर्णय घेतला असून मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्वपूर्ण योजना आहे. तसेच इतर मागासवर्ग विभागाला भरघोस निधी उपलब्ध करून देऊन या अंतर्गत येणाऱ्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही हा महत्त्वपूर्ण विचार संत शिरोमणी सावता महाराज यांनी मांडला. आपलं कर्तव्य व कर्म करत रहावे ही शिकवण सावता महाराजांनी दिली . अशी माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगून संत शिरोमणी सावता महाराज वास्तुशिल्प आराखड्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अरण तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात येत आहे. लवकरच या भागाचा विकास होऊन भक्तांना येथे चांगल्या सुविधा उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here