मुंबई,दि.31: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी फासावर लटकेपर्यंत पोलिस स्वस्थ बसणार नाहीत, अशी ग्वाही दिली. देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप होत असलेला वाल्मीक कराड सीआयडीला शरण आला. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही आणि कोणालाही सोडणार नाही, या प्रकरणात ज्याचा संबंध ज्या प्रकरणात आढळेल त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. असे फडणवीस म्हणाले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड आज अखेर सीआयडीपुढे शरण आला. सध्या कराडची चौकशी सुरू आहे. वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. या प्रकरणावर बोलताना फडणवीस यांनी बीडच्या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, बीडच्या प्रकरणात कुणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा, ज्या ज्या प्रकरणात संबंध आढळेल; त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही”, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.