सोलापूर,दि.31: देशभरात Jio चे सिम कार्ड वापरणारे मोबाईल ग्राहक सर्वाधिक आहेत. नेमके याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. सायबर फसवणुकीची एक नवीन पद्धत समोर आली आहे. सायबर फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सायबर दोस्तने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. यामध्ये जिओच्या नावाचा वापर करण्यात आला आहे.
X वर पोस्ट करत सायबर दोस्तने जिओ ग्राहकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. जिओच्या नावाने फेक मेसेज अनेकांना येत असून खरं तर एक एपीके फाइल आहे, ती फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर यूजरचा मोबाइलही हॅक होऊ शकतो. अशा परिस्थितीत युजर्सचे बँक खातेही रिकामे होऊ शकते.
पोस्टमध्ये सायबर दोस्तने म्हटले आहे की, Jio Internet Speed #5G Network Connection.apk सारखी फाईल डाउनलोड करू नका. ही एक धोकादायक फाइल आहे, जी तुमचा फोन हॅक करून तुमचा डेटा चोरू शकते. सुरक्षित राहण्यासाठी, केवळ अधिकृत ॲप स्टोअरमधून ॲप्स डाउनलोड करा.
apk फाइल का डाउनलोड करू नका
मोबाईलमध्ये अज्ञात स्त्रोताकडून येणारी Apk फाईल डाउनलोड केल्यामुळे अनेक प्रकारच्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. यामुळे उपकरणाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ते तुमचे बँक खाते आणि अनेक संवेदनशील तपशील इत्यादी चोरू शकतात.
Apk फाइलचे धोके काय आहेत?
अज्ञात स्त्रोतांकडून येणाऱ्या Apk फाइल्समध्ये मालवेअर, स्पायवेअर आणि व्हायरस इत्यादी असू शकतात, जे फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर हॅकर्ससाठी काम करू शकतात. यासह, हॅकर्स मोबाइलमध्ये उपस्थित असलेले संवेदनशील तपशील चोरू शकतात आणि फोनवर रिमोट ऍक्सेस देखील मिळवू शकतात.