उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला मनोज जरांगे पाटील यांना इशारा

0

मुंबई,दि.25: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मराठा आंदोलन संपवण्याचा प्रयत्न फडणवीस करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. आंदोलन संपवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची माणसं आहेत. हे सर्व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले.

मी आज टोकाचा निर्णय घेत आहे. मला मारण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. माझे एन्काउंटर करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. माझा बळी घ्या. असे मनोज जरांगे यांनी म्हटले. यानंतर ते मुंबईकडे निघाले आहेत.

मनोज जरांगे यांनी सागर बंगल्यावर येतो आपल्याला मारून दाखवा असं आवाहनही केले. यावर अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या माणसामुळे कोर्टात आरक्षण टिकलं त्याच्याबाबत असं वक्तव्य खपवून घेणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. याबाबत ZEE 24 व tv9 मराठीने वृत्त दिले आहे.

कुणीही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही बोललं तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी जरांगे यांचे नाव न घेता दिलाय. तर जरांगेंच्या आंदोलनामागे कोण, हेही शोधणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. 

सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा सर्वानीच चालवली पाहिजे. मराठा आरक्षणाबद्दल राज्यप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. मार्ग काढायचा प्रयत्न केला. जालना येथे गेले. नवी मुंबईला गेले. तरीही शिवराळ भाषा वापरली जात आहे. आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, अधिकाऱ्यांना बोलतानाही त्यांच्याशी शिवराळ भाषा वापरली जात आहे. हे नेमकं कोण करतंय हे पाहणं गरजेचं आहे असे अजित पवार म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here