Ajit Pawar: आम्ही शिव्या सुरू केल्यास पळून जावे लागेल: अजित पवार

0

दि.४: राज्यात सुरू असलेल्या वादाच्या मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) तळेगावमध्ये बोलताना टोलेबाजी केली आहे. यावेळी बोलताना अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना देखील सुनावले. सुप्रिया सुळेंविषयी बोलताना चंद्रकांत पाटलांनी घरी जाऊन स्वयंपाक करा, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यावरून अजित पवारांनी टोला लगावला आहे. “जगात आमचा पक्ष मोठा आहे, असे भाजपावाले एकीकडे सांगतात आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष महिलांबद्दल पुण्यात अपशब्द वापरतात. आम्ही ग्रामीण भागातून आलो आहेत. आम्हालाही बरेच काही बोलता येते. ‘भ’ ची भाषा आम्ही सुरू केली तर पळून जाण्याची वेळ येईल. पण आम्ही त्या स्तरावर जाणार नाही”, असे अजित पवार म्हणाले.

तळेगाव नगरपरिषद इमारतीचं आज अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर बोलताना भाजपावर टीकास्त्र सोडलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी मावळमधील आधीच्या आमदारांना उद्देशून निशाणा साधला. “मावळात कित्येक वर्षे राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत नव्हता, याची खंत होती. मात्र, सुनील शेळकेंच्या माध्यमातून सगळा अनुशेष भरून निघाला. आघाड्यांऐवजी सर्व स्थानिक निवडणुका यापुढे घड्याळाच्या चिन्हावर लढवाव्यात. तळेगाव, वडगाव, लोणावळा यासह जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या १२ जागा निवडून द्या. मग महत्त्वाची पदे मावळात देऊ, अशी ग्वाही अजित पवारांनी यावेळी दिली.

हेही वाचा Coronavirus: केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठवले पत्र, राज्यातील या 6 जिल्ह्यांनी वाढवली चिंता

तुमचा यापूर्वीचा आमदार राज्यमंत्री होता. तरीही तालुक्यासाठी निधी आणता आला नाही. निधी आणण्यासाठी अक्कल असावी लागते. पाठपुरावा करावा लागतो. ते त्यांना जमले नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी टोला लगावला. मावळमधील माजी आमदार बाळा भेगडे यांच्यावर अजित पवारांनी नाव न घेता निशाणा साधला आहे.

“प्रत्येकाने आपल्या जाती, धर्माचा अभिमान जरूर बाळगावा. मात्र, दुसऱ्याला त्रास होईल, असे काही करू नये. कोणताही धर्म चुकीचे वागा, असे सांगत नाही. सर्व जाती, धर्मातील मावळे एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून कल्याणकारी राज्य केले, हा इतिहास आहे. नेमका तोच विसरून नको त्या गोष्टी केल्या जात आहेत. लोकशाही, राज्यघटना टिकवण्याचे सर्वांपुढे आव्हान आहे. देशाच्या एकतेला धक्का बसता कामा नये”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here