सोलापूर,दि.२१: आरोपींविरुद्ध खुनाचे कलम वाढविण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. यात आरोपी तम्मा शेंडगे, विजय शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, विकास शेंडगे, विलास शेंडगे, तेजस बाळगे, भिवा शेंडगे, दत्ता शेंडगे सर्व रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर यांच्यावर खुनाचे कलम वाढविण्यासाठी केलेला अर्ज सोलापुर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पाटील यांनी फेटाळला आहे.
यात हकिकत अशी की, फिर्यादी दि. २०/०८/२०१८ रोजी सकाळी ७.४५ वा. हा नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला होता त्यावेळी तहान लागल्यामुळे फिर्यादी हा पाणी पिण्यासाठी कॉलेज मधील पाण्याच्या टाकीजवळ येऊन पाणी पीत असताना फिर्यादीच्या शेजारी राहत असलेले विजय शेंडगे हे तिथे येऊन फिर्यादी यास तू माझ्याकडे का बगतोस असे विचारले. तेव्हा फिर्यादीने मी तुम्हाला कुठे बघत आहे असे म्हणाला. तेव्हा विजय शेंडगे यांनी तू कॉलेजच्या बाहेर ये तुला बघतो असे म्हणून कॉलेज मधून बाहेर निघून गेले.
त्यानंतर फिर्यादी सकाळी ९ च्या सुमारास कॉलेजच्या गेट जवळ बाहेर आला व फिर्यादीने फोनवर चुलत्यास संपूर्ण हकीकत सांगितली व चुलत्याची वाट बघत थांबला असता ९.१५ च्या सुमारास विजय शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, तेजस बाळगे, विलास शेंडगे हे सर्वजण फिर्यादिजवळ आले व ऋषिकेश याने फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली असता फिर्यादीचे वडील तिथे आले व त्यांनी माझा मुलगा आजारी आहे त्यास मारू नका म्हणून असे म्हणून सोडवासोडवी केली.
तेव्हा ते चौघे दमदाटी करून तिथून निघून गेले. नंतर सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा त्याचे वडील व चुलते यांच्यासोबत मलकारसिद्ध मंदिराजवळ थांबले असताना तम्मा शेंडगे, विजय शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, विकास शेंडगे, विलास शेंडगे, तेजस बाळगे, भिवा शेंडगे, दत्ता शेंडगे हे सर्वजण तेथे आले व फिर्यादीस शिवीगाळ करू लागले. त्यावेळी फिर्यादीचे वडील व चुलते यांनी सर्वाना समजावून सांगितले पण विजय शेंडगे याने त्यांच्या मुलीचा खोटा संशय घेऊन फिर्यादीच्या अंगावर धावून आला व सर्वांनी मिळून लाथा बुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी ऋषिकेश शेंडगे याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यावेळी फिर्यादीचे वडील व चुलते यांनी सोडवासोडवी करत असताना त्यांना सुद्धा वरील लोकांनी हाताने व लाथा बुक्क्याने मारहाण केली. सदर मारहाणीत फिर्यादीला डोक्यात जखम होऊन रक्तस्त्राव होऊ लागल्याने फिर्यादी व त्याचे वडील व चुलते हे मंद्रूप पोलीस स्टेशन येथे गेले. अशा आशयाची फिर्याद मंद्रूप पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती.
सदर कामी पोलीसांनी तपास करुन दोषारोपञ न्यायालयात दाखल केले. सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षाने सदर गुन्ह्यातील फिर्यादीचे घटनेनंतर २ महिन्यांनी निधन झाल्याने कोर्टात फिर्यादीच्या मृत्यूस आरोपी हेच जबाबदार आहेत, त्यामुळे सदर गुन्ह्यात खुनाचे कलम ३०२ वाढ करण्यात यावे असा अर्ज कोर्टात दाखल केलेला होता.
त्या अर्जास आरोपीचे वकिल ॲड. अभिजित इटकर यांनी हरकत घेतली व सदर खटल्यामध्ये सदर जखमीस तपासलेल्या वैदकीय अधिकारी यांच्या उलट तपासणीमध्ये समोर आलेले अनेक मुद्द्यांचा संदर्भ देत असा युक्तिवाद करण्यात आला की, जखमी व्यक्तीच्या मेंदूस कितपत व कुठेपर्यंत जखम झाल्यास त्याचा प्रवास मृत्यूकडे होतो तसेच सदर जखमीने किती दिवस दवाखान्यामध्ये कोणते उपचार घेतले व ते कितपत त्याच्यावर लागू झाले आणि सदर झालेली तथाकथित जखम हीच त्याच्या मृत्यूस कारणीभूत आहे याचा उहापोह युक्तिवादामध्ये करण्यात आला.
सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोलापुर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पाटील यांनी आरोपी तम्मा शेंडगे, विजय शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, विकास शेंडगे, विलास शेंडगे, तेजस बाळगे, भिवा शेंडगे, दत्ता शेंडगे सर्व रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर यांच्यावर खुनाचे कलम वाढविण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला.
यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. नागेश मेंडगुदले, अॅड. संतोष आवळे, अॅड. राम शिंदे, अॅड. फैयाज शेख, अॅड. सुमित लवटे, अॅड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.