नवी दिल्ली,दि.17: दिल्लीतील हनुमान जयंती (Hanuman Jayanti Violence) दरम्यान शनिवारी जहांगीरपुरी भागात दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6 वाजता झालेल्या हिंसाचारात दगडफेक झाली आणि काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. जहांगीरपुरी आणि इतर संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी अधिकार्यांशी बोलून हिंसाचार करणार्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेचा तपास विशेष टीममार्फत करण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. सर्व पक्षांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हिंसाचारात सहभागी 14 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे शनिवारी झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी दंगल, हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत आतापर्यंत एकूण 9 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली असून त्यात आठ पोलीस कर्मचारी आहेत. जखमींमध्ये दिल्ली पोलिस उपनिरीक्षक मेधा लाल मीना यांचाही समावेश असून, त्यांच्या हाताला गोळी लागली आहे. त्यांना गोळी कशी लागली याचा तपास सुरू आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी दिल्ली पोलिसांचे विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) दीपेंद्र पाठक यांच्याशी चर्चा केली आहे. हिंसाचार पाहता आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
हिंसाचारात सहभागी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. रविवारी सकाळी पाच जणांना अटक करण्यात आली. सीसीटीव्ही आणि व्हायरल व्हिडिओवरून काही लोकांची ओळख पटली असून, त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासासाठी क्राइम ब्रँच आणि स्पेशल सेलची 10 टीम तयार करण्यात आल्या आहेत.
दिल्ली पोलिसांचे पीआरओ अनयेश रॉय यांनी सांगितले की, दरवर्षी हनुमान जयंतीला ही पारंपारिक मिरवणूक काढण्यात येते. रॉय म्हणाले, “जेव्हा ही मिरवणूक कुशल सिनेमाजवळ पोहोचली तेव्हा दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. दगडफेकही करण्यात आली. “मिरवणुकीसह तैनात असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली परंतु दगडफेकीमुळे काही पोलिस जखमी झाले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले,” असे ते म्हणाले. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे रॉय यांनी सांगितले.
दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दंगलखोरांवर कठोर कारवाईचा इशारा दिला असून नागरिकांना सोशल मीडियावरील अफवा आणि खोट्या बातम्यांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे.
रविवारी सकाळी हिंसाचारग्रस्त जहांगीरपुरी भागाला भेट देणारे उत्तर-पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार हंसराज हंस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या संपूर्ण प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत.
ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले असून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. केजरीवाल म्हणाले की, उपराज्यपालांनी त्यांना आश्वासन दिले आहे की शांतता सुनिश्चित करण्यासाठी सर्व पावले उचलली जात आहेत आणि दोषींना सोडले जाणार नाही.
या घटनेवरून राजकारणही सुरू झाले आहे. कपिल मिश्रा आणि भाजपच्या दिल्ली युनिटचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांच्यासह पक्षाच्या काही नेत्यांनी आरोप केला की या भागात राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांचा या घटनेत हात आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार मनोज तिवारी यांनी असा दावा केला आहे की “हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे ज्याची त्वरित चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे”.