दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर केला मोठा गौप्यस्फोट

0

मुंबई,दि.५: एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, सध्या राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे संयुक्त सरकार असले तरी याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची भाजपासोबत चर्चा सुरू होती, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधाला जास्त महत्त्व देतो. त्याच वेळेला त्यांनी आपल्या पदाचा त्याग करायचे ठरवले होते. पुढच्या १५ दिवसांत ते आपल्या पदाचा त्याग करणार होते. मात्र दरम्यानच्या काळात भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन झाले. निलंबन झाल्यानंतर भाजपाकडून निरोप आला होता. आपली बोलणी सुरू आहे. असे निलंबन योग्य नाही, असे मत भाजपाने व्यक्त केले होते. पुढे कोर्टाने हे निलंबन रद्द ठरवण्यात आले. पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याचे उद्धव ठाकरे यांना आवडले नाही. याच कारणामुळे ही बोलणी थांबली,” असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. यातील एकही शब्द खोटा निघाला तर मी सार्वजनिक जीवनातून सन्यास घेईन, असे देखील दीपक केसरकर म्हणाले आहेत.

“आम्ही आसामला निघून गेल्यानंतरही आम्ही आमच्या प्रतिनिधीला उद्धव ठाकरेंशी बोलणी करायला पाठवले होते. आमच्या प्रतिनिधींना उद्धव ठाकरेंनी सांगितले होते की, झालेले विसरून जाऊ. आपण एकत्र येण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा. आम्ही आघाडी करायला तयार आहोत. मात्र यासाठी भाजपा पक्ष तयार नव्हता. तसेच आम्ही आसाममधील आमदारही तयार नव्हतो,” असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here