दत्तात्रय भरणे यांना सोलापूरच्या पालकमंत्री पदावरून हटवणार? हे होणार पालकमंत्री

0

सोलापूर,दि.२१: सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना हटवण्यात येणार असल्याची बातमी दैनिक लोकमतने दिली आहे. उजनी धरणाच्या पाण्याचा वाद सुरू आहे. उजनी धरणावरील नव्या प्रकल्पाचा वाद वाढत आहे. महाविकास आघाडीतील पक्षही राष्ट्रवादीवर टीका करीत आहेत. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या ताेंडावर उजनीच्या पाण्याचा वाद चिघळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना हटवून ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करण्याबाबत विचार सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शुक्रवारी याबद्दल स्पष्ट संकेत दिल्याचे जिल्ह्यातील नेत्यांनी लोकमतला सांगितले. 

माजी आमदार राजन पाटील, महेश कोठे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, दिलीप कोल्हे, विद्या लोलगे, हरिभाऊ जाधव यांनी शुक्रवारी सकाळी शरद पवार यांची बारामतीमध्ये भेट घेतली. उजनी धरणावरील नव्या लाकडी निंबाेळी प्रकल्पाच्या मुद्यामुळे जिल्ह्यातील वातावरण तापत आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरच अनेकांचा रोख आहे. पालकमंत्री पक्ष संघटनेला वेळ देत नाहीत. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हटवा अशी मागणी या नेत्यांनी केल्याचे सांगण्यात आले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या अहमदनगरचे पालकमंत्री आहेत. मुश्रीफांनाही बदल हवा आहे. २५ मे नंतर बदल दिसेल असे या शरद पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांना सांगितले. सोलापुरात कामगार वर्ग आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांना मुश्रीफ ओळखून आहेत. एकूणच ही पार्श्वभूमी पाहता मुश्रीफांना सोलापूरचे पालकमंत्री करण्याचा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने लोकमतला सांगितले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here