बोगस वारस नोंदप्रकरणी न्यायालयाने फिर्याद रद्द करण्याची याचिका फेटाळली

0

सोलापूर,दि.१४: सदर प्रकरणात हकीकत अशी की, प्रकाश विनायक पाटील, रा. घोळसगांव, ता. अक्कलकोट यांची मौजे घोळसगांव येथे शेतजमीन असून, सदर शेत जमीनीपैकी काही जमीन साठवण तलावाच्या प्रयोजनाकरीता शासनास विकली. त्याप्रमाणे तत्कालिन तलाठी व मंडलाधिकारी यांनी दिनांक १७.०८.०१९ रोजी सदर फेरफार नं. २३०० हा प्रमाणित करून तशी नोंद केली. त्यानंतर दिलीप सिद्राम पाटील, गुंडेराव सिद्राम पाटील, व्यंकटराव सिद्राम पाटील, भालचंद्र सिद्राम पाटील व पुतळाबाई सिद्राम पाटील सर्व रा. घोळसगांव, ता. अक्कलकोट यांनी तत्कालीन तलाठी विकास घंटे यांचेकडे दिनांक १०.०६.२०१९ रोजी या प्रकरणातील फिर्यादी प्रकाश विनायक पाटील हे दिनांक १५.०१.१९८४ रोजी मयत झाले आहेत. असा अर्ज देवून फक्त वरील लोक हे सदर जमीनीचे वारस आहेत व याशिवाय कोणीही वारस नाही असे प्रतिज्ञापत्र करून यातील फिर्यादी प्रकाश पाटील यांचा मृत्यू दाखला देवून वारस नोंद करणेकामी दिला व सदर मृत्यू दाखल्याची तत्कालीन तलाठी विकास घंटे यांनी कोणतीही खातरजमा न करता व प्रत्यक्ष गावी जावून कोणतीही चौकशी न करता तसेच पंचनामा न करता वरील लोक व तसेच तत्कालीन मंडलाधिकारी यांच्याशी संगनमत करून सदरची नोंद प्रमाणित केली.

यातील फिर्यादी प्रकाश विनायक पाटील यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अक्कलकोट यांचेकडे वरील लोकांविरोधात खाजगी फिर्याद दाखल केली. सदर खाजगी फिर्यादीवर सुनावणी होवून सदर लोकांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सदर आरोपी दिलीप पाटील, व्यंकटराव पाटील, भालचंद्र पाटील, पुतळाबाई पाटील, महादेवी राजमाने यांनी सदर आदेशाविरूध्द प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांचकडे पुनर्विचार याचिका दाखल करून सदरचा आदेश रद्द करण्याची विनंती केली.

सदर याचिकेच्या सुनावणीवेळी यातील मुळ फिर्यादीचे वकिल ॲड. अभिजीत इटकर यांनी असा युक्तिवाद केला की, सदर फिर्यादी यांच्या बनावट मृत्यूदाखल्याचा वापर करून सदरची फेरफार नोंद घेण्यात आलेली, असून ती नोंद घेताना तत्कालीन अधिकाऱ्यांनी कुठलीही शहनिशा न करता, तसेच कुठल्याही इतर हक्क असणाऱ्या वारसांना नोटीसा न काढता, सदर नोंदी या प्रमाणित केलेल्या आहेत त्यामुळे प्रथमदर्शनी गुन्हा केलेला दिसून येतो.

सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश शब्बीर औटी यांनी सदर आरोपींची याचिका फेटाळून लावली.

यात मुळ फिर्यादीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. संतोष आवळे, ॲड. फैयाज शेख, ॲड. राम शिंदे यांनी तर आरोपीतर्फे ॲड. मुल्ला यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here