corona update: Omicronच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिला इशारा, महाराष्ट्रासह या राज्यांनी वाढवली चिंता

0

नवी दिल्ली,दि.५: corona update: देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona Cases In India) रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच देशात ओमिक्रॉन व्हेरीयंट (Omicron Variant) रुग्णांचीही संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या देशातील स्थितीची माहिती दिली. राजस्थानमध्ये एका ७३ वर्षीय नागरिकाचा झालेला मृत्यू हा तांत्रिकदृष्ट्या ओमिक्रॉनमुळे झाल्याचं स्पष्ट आहे. पण या व्यक्तीला मधुमेहासह इतरही काही आजार होते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल (Health Ministry Joint Secretary Lav Agarwal ) यांनी दिली. जगभरात आतापर्यंत ओमिक्रॉनमुळे १०८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, झारखंड आणि गुजरात या देशातील ८ राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील २८ जिल्ह्यांमध्ये आठवड्याला कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर हा १० टक्क्यांवर आहे, अशी चिंता व्यक्त करत अग्रवाल यांनी इशारा दिला. देशात ओमिक्रॉनच्या एन्ट्रीनंतर करोना संसर्ग अचानक ६.३ पट वेगाने वाढत आहे. देशात २९ डिसेंबरपर्यंत रोज ९ हजार नवीन रुग्ण आढळून येत होते. पण आता ८ दिवसांत बुधवारी ५८ हजारांवर आकडा गेला आहे.

ओमिक्रॉन भारतासाठी धोकादायक: डॉ. पॉल

जगभरात काही देशांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग ज्या वेगाने पसरला, तितक्याच वेगाने तो कमीही झाला. पण असेच भारताच्या बाबतीत घडू शकेल, हे सांगणं घाईचं ठरेल. कारण भारतातील लोकसंख्या पाहता ओमिक्रॉनचा संसर्ग वाढल्यास (लाट आल्यास) तो किती काळ सुरू राहील हे सांगणं कठीण आहे, असा गंभीर इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिला आहे.

ओमिक्रॉनसाठी आले RT-PCR kit

ओमिक्रॉन आहे की नाही? हे तपासण्यासाठी आवश्यक असलेले RT-PCR kit टाटा एमडी आणि आयसीएमआरने मिळून विकसित केले आहे. या RT-PCR kit ला डीसीजीआयने मंजुरीही दिली आहे. या RT-PCR kit मुळे ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की नाही, हे फक्त ४ तासांत कळणार आहे, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली. देशातील शहारांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. यामुळे गर्दीची ठिकाणं टाळावीत, असे आवाहन डॉ. भार्गव यांनी केले.

यांना देण्यात येणार प्रिकॉशन डोस

येत्या १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणारा प्रिकॉशन डोस म्हणजे तिसरा डोस हा कुठल्या लसीचा दिला दिला जाणार, याची माहिती आज केंद्र सरकारने दिली. ज्यांनी आधी कोवॅक्सिन लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना कोवॅक्सिनचा आणि ज्यांनी कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना कोविशिल्ड लसीच डोस दिला जाईल. म्हणजे आधी ज्या लसीचे दोन डोस घेतले आहेत त्याच लसीचा प्रिकॉशन डोस दिला जाईल, असे व्ही. के. पॉल म्हणाले. याचाच अर्थ लसींचा मिक्सिंग डोस दिला जाणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here