Corona Third Wave: महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट या काळात असणार उच्चांकावर

0

बेंगळुरू,दि.१०: कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. ओमिक्रॉन रुग्णांची संख्याही वाढत आहे. तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात व दिल्लीत सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशात गेल्या २४ तासांत १ लाख १७ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तब्बल सात महिन्यांनंतर देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने लाखाचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असताना तिसरी लाट पीकवर कधी असणार आणि रुगसंख्येत घट केव्हापासून होणार, याबाबत एक महत्त्वाचा स्टडी रिपोर्ट हाती आला आहे.

बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय सांख्यिकी संस्था यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अभ्यास केला आहे. त्याचा अहवाल आला असून त्यात महत्त्वाचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. भारतातील कोरोनाच्या आधीच्या दोन लाटा, कोरोनाची सध्याची स्थिती, ओमिक्रॉन रुग्णसंख्या, कोरोनाची जागतिक स्थिती, त्यात ओमिक्रॉनच्या एंट्रीनंतर झालेले बदल, भारतातील लसीकरणाची टक्केवारी, इम्युनिटी या सर्वाचा अभ्यास करून त्याआधारे निष्कर्ष काढले गेले आहेत.

महाराष्ट्रात तिसरी लाट या काळात असणार उच्चांकावर

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असून महाराष्ट्रात या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तिसरी लाट पीकवर जाईल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रानंतर दिल्लीत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तिथे पुढच्या आठवड्यात रुग्णसंख्या पीकवर जाईल आणि फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्येत मोठी घट होईल व स्थिती नियंत्रणात येईल असा अंदाज अभ्यासकर्त्यांनी वर्तवला. पंजाब, लक्षद्वीप, पदुचेरी येथे फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्येचा पीकवर पोहचेल. एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के लोक जोखमीच्या गटात असल्याचे गृहित धरून हे अंदाज बांधले गेले आहेत.

ओमिक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे ज्या दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता तेथील रुग्णसंख्येचा ग्राफ हा प्रमुख आधार मानून भारतात तिसऱ्याला लाटेचा पीक केव्हा असेल याबाबत तर्क लावण्यात आला आहे.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असून याच महिन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही लाट पीकवर असेल. राज्यानुसार हा पीकचा कालावधी वेगवेगळा असेल, असे या स्टडी रिपोर्टचे म्हणणे आहे. भारतातील रुग्णसंख्येचा वाढता ग्राफ लक्षात घेता दैनंदिन रुग्णसंख्या येत्या काही दिवसांत ३ लाख, ६ लाख आणि अगदी १० लाखांपर्यंत जाऊ शकते.

तिसऱ्या लाटेचा पीक आल्यानंतर मार्च महिन्यात ही लाट ओसरायला सुरुवात होईल. या लाटेत इम्युनिटीबाबत जो वर्ग कमकुवत आहे त्याला अधिक फटका बसेल. मात्र दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तो कमीच असेल, असा अंदाजही या अभ्यासातून काढला गेला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here