दि.20: Coronavirus In India: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढला आहे. भारतात अनेक राज्यात कमी झालेली कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणि पॉझिटिव्ह रेटमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यासंदर्भात आता पुन्हा एकदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये राज्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्यास सांगण्यात आलं आहे.
आवश्यक निर्णय घेण्याच्या सूचना
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये सतत वाढणाऱ्या कोरोना सकारात्मकतेच्या दराचा उल्लेख करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयाने याबाबत आवश्यक पाऊलं उचलण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यांनाही सतर्क राहण्याचा सूचना ही देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि इतर काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे याआधीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहित, आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या पत्रामध्ये कोरोना निर्बंध लागू करण्याच्या तसेच लसीकरावर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 600 हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे तिथला कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 7 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. मागील चार आठवड्यांपासून दिल्लीमध्ये सातत्याने रुग्ण वाढत आहेत. सकारात्कमकता दर 1 टक्क्यांवरून 7 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यासंदर्भात लवकरच दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच डीडीएमएची (DDMA) बैठक होऊ शकते. ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.